वाढत्या रुग्ण संख्येमुळे जम्बो कोरोना सेंटर्सच्या सुविधा वाढवणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईतील वाढत्या रुग्णांना वेळेत आणि दर्जेदार उपचार मिळावेत यासाठी उभारण्यात आलेल्या पाच जम्बो कोरोना सेंटर्सच्या सुविधांवर ताण वाढला आहे. त्यामुळे रुग्णांची गैरसोय दूर करण्यासाठी सेंटर्सच्या सुविधा वाढवण्यावर भर दिला जाणार असून बीकेसी आणि मुलुंड जम्बो कोरोना सेंटर्सचा उद्या बुधवार, 21 एप्रिलला पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी आढावा घेणार आहेत.

 मुंबईत कोरोना रोखण्यासाठी पालिकेने युद्धपातळीवर बीकेसी, मुलुंड, नेस्को, दहिसर आणि वरळीत एनएससीआयमध्ये जम्बो कोरोना सेंटर्स उभारण्यात आली आहेत. पालिका, राज्य आणि खासगी रुग्णालयांसह या जम्बो कोरोना सेंटर्समध्येही रुग्णालयाच्या धर्तीवर सर्वोत्तम सुविधा पुरविण्यात येत आहेत, मात्र गेल्या काही दिवसांपासून मुंबईत रुग्णसंख्या वाढत असून सुविधांवर ताण येत आहे. त्यामुळे कुलर्स, पंखे, मनुष्यबळाचे अधिक योग्य प्रकारे नियोजन केले जाणार आहे. त्याचबरोबर इतर अनेक सुविधा वाढवण्यावर भर दिला जाणार आहे. त्या पार्श्वभूमीवर सुरेश काकाणी बीकेसी आणि मुलुंड येथील सुविधांचा आढावा घेऊन पालिका अधिकारी, कर्मचाऱयांशी संवाद साधणार आहेत.

कोरोना रुग्णांची संख्या वाढल्यामुळे जम्बो कोरोना सेंटर्सवरील सुविधांवरही ताण वाढला आहे, मात्र तिथे दाखल करण्यात येत असलेल्या सर्वच रुग्णांकडे जातीने लक्ष दिले जात आहे. सुविधांचा आढावा घेऊन काही त्रुटी असतील तर त्या दूर केल्या जातील आणि जिथे सुविधा वाढवणे आवश्यक आहे तिथे वाढवण्यासाठी पालिका प्रशासन प्रयत्न करणार आहे.
– सुरेश काकाणी, अतिरिक्त आयुक्त