दिवसाढवळ्या तोतया पोलिसांनी वयोवृद्ध शेतकऱ्याला लुटले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कळंबमध्ये तोतया पोलिसांनी एका वयोवृद्ध शेतकऱ्याला लुटल्याची घटना घडली आहे. या तोट्या पोलिसांनी शेतकऱ्याला आपण पोलीस असल्याचे सांगत तुमच्या अंगावरील शर्टचा कपडा चोरीचा आहे, अशी दमदाटी केली. यानंतर या चोरटयांनी तपास करीत असल्याचा बहाणा करून वयोवृद्ध शेतकऱ्याच्या खिशातील 9 ग्राम 750 मिली सोन्याचे दागिने चोरून नेहले. ही घटना सकाळी 11 वाजेच्या सुमारास शहरातील ढोकी रस्त्यावरील बुलढाणा अर्बन बॅंक परिसरात घडली. याप्रकरणी कळंब पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून रमेश सुब्राव वळेकर (वय- 55 रा.बोरगाव ता.केज) असे फसवणूक झालेल्या वृद्ध शेतकऱ्याचे नाव आहे.

केज तालुक्यातील रमेश वळेकर या वयोवृद्ध शेतकऱ्यांनी आपल्या पत्नीचे सोने बुलढाणा अर्बन बॅंकेत तारण ठेवले होते. सोयाबीनची विक्री करून जमा झालेले पैसे घेऊन संक्रातीच्या सणानिमित्त तारण ठेवलेले सोन्याची बोरमाळ, कानातील झुबे असे 9 ग्राम 750 मिली सोने एकूण 36 हजार रुपयांचे बॅंकेतून सोडवून घेण्यासाठी बुलढाणा अर्बन बॅंकेत ते सकाळी साडेदहाच्या सुमारास आले होते. बॅंकेतून तारण ठेवलेले सोने घेऊन पॉकेटमध्ये ठेवून बनियनच्या खिश्यात ठेवले व वयोवृद्ध शेतकरी बॅंकेच्या बाहेर आले. ढोकी रस्त्यावरून छत्रपती शिवाजी महाराज चौकाकडे येत असताना दुचाकीवरून दोन तोतया पोलीस आले व शेतकरी वळेकर यांना या दोन भामट्यानी थांबवून पोलीस असल्याची बतावणी केली. कपड्याची चोरी झाली असून तुमच्या अंगावरील चोरीचा कपडा आहे. आम्हाला तपास करायचा आहे, असे सांगून अंगावरील कपड्याला हात लावत बनिएनच्या खिश्यात ठेवलेले 36 हजार रुपये किमतीचे नऊ ग्राम 750 मिली सोन्याचे दागिने घेऊन ढोकी रस्त्याने पळून गेले.

दिवसाढवळ्या वृद्ध शेतकऱ्याना लुटण्याच्या प्रकारामुळे शहरात खळबळ उडाली असून नागरिकांच्या सुरक्षितेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. महिलासाठी मकरसंक्रातीचा सण अत्यंत महत्वाचा असून सोने अंगावर परिधान करून महिला घरोघरी फिरतात. त्यादृष्टीने पोलिसांनी खबरदारी घेण्याची आवश्यक आहे. शहारातील तोतया पोलिस बनून भोळ्या भाबडया ग्रामीण भागातील लोकांची लुबाडानी केल्याची ही दुसरी घटना आहे.