
बनावट लसीकरणप्रकरणी वर्सेवा पोलिसांनी आज राजेश पांडे, चंदन मिश्रा आणि नितीन मोडेला अटक केली. अटक केलेल्या त्या तिघांनी लसीकरणाचे प्रमाणपत्र कुठून आणले होते आणि त्यांच्या बँक खात्यात किती पैसे जमा झाले याचा तपास वर्सेवा पोलीस करणार आहेत. त्या तिघांना न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
राजेश पांडे आणि त्याच्या साथीदारांनी मे महिन्यात एका खासगी कंपनीत 210 जणांचे लसीकरण केले होते. लसीकरणाच्या मोबदल्यात पांडेने 2 लाख 10 हजार रुपये घेतले होते. कांदिवलीच्या हिरानंदानी सोसायटीमधील लसीकरण घोटाळा उघड झाल्यावर त्या कंपनीने वर्सेवा पोलीस ठाण्यात धाव घेतली. पंपनीच्या तक्रारीवरून वर्सेवा पोलिसांनी पांडे आणि त्याच्या इतर साथीदारांविरोधात गुन्हा दाखल केला होता. त्या गुह्याच्या तपासादरम्यान पोलिसांनी आतापर्यंत 60 जणांचे जबाब नोंदवले असून घटनास्थळाचे सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले आहेत. लसीकरणाच्या नावाखाली ग्लुकोजचे पाणी देऊन फसवणूक केल्याने राजेश, चंदन आणि नितीनला वर्सेवा पोलिसांनी अटक केली. आज त्या तिघांना अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले.
या गुह्यात पोलिसांनी आतापर्यंत 60 जणांचे जबाब नोंदवले असून लसीकरणाच्या ठिकाणाचे सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले आहेत. पोलीस आता या त्या तिघांचे बँक खाते तपासणार आहेत. कोणाच्या खात्यात किती आणि कधी पैसे आले होते याचा तपास केला जाणार आहे. बँक खात्यावरून या टोळीने लसीकरणात किती पैसे कमवले होते हे आता स्पष्ट होणार आहे.
तसेच या टोळीने ज्यांचे लसीकरण झाले त्यांना दिलेले प्रमाणपत्र खरे होते का हे तपासले जाणार आहे. ते प्रमाणपत्र कोणत्या रुग्णालयाचा आयडी वापरून तयार केले होते याचा तपास पोलीस करणार आहेत. या टोळीने ज्यांना लस दिली होती ती किती खरी होती का आणि असल्यास ती लस किती एमएलचा डोसमध्ये दिली होती हे तपासले जाणार आहे. लसीकरण घोटाळाप्रकरणी त्या तिघांची पोलीस समोरासमोर बसवून चौकशी करणार आहेत.


























































