रंगभूमीवरील विनोदाचा प्रधान हरपला… किशोर प्रधान यांचे निधन

27

सामना प्रतिनिधी । मुंबई

अचूक टायमिंग आणि अभिनयाच्या जोरावर मराठी, इंग्रजी रंगभूमी आणि चित्रपटात स्वतःचा वेगळा ठसा उमटवणारे ज्येष्ठ अभिनेते किशोर प्रधान यांचे आज पहाटे निधन झाले. ते 83 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी शोभा प्रधान आहेत.

मराठी, इंग्रजी रंगभूमीबरोबरच त्यांनी मराठी, हिंदी चित्रपट आणि दूरदर्शन मालिकांमधून काम केले. ‘शिक्षणाच्या आयचा घो’, ‘लालबाग परळ’, ‘भिंगरी’, ‘मी शिवाजीराजे भोसले बोलतोय’ या मराठी चित्रपटांबरोबरच ‘लगे रहो मुन्नाभाई’, ‘जब वुई मेट’ यातील त्यांच्या भूमिका प्रेक्षकांच्या दीर्घकाळ लक्षात राहिल्या. दूरदर्शनवरील ‘गजरा’ हा कार्यक्रम त्यांनी पत्नी शोभाबरोबर सादर केला होता.

मूळचे नागपूरचे असलेल्या प्रधान यांची आईही नाटकांत काम करायच्या. त्यामुळे अभिनयाचे बाळकडू त्यांना त्यांच्या आई मालतीबाई यांच्याकडून मिळाले. नागपूरच्या मॉरीस महाविद्यालयातून पदवी मिळाल्यानंतर त्यांनी अर्थशास्त्रातून एमए केले. टाटा इन्स्टिटय़ूट ऑफ सोशल सायन्सेस (टीस)मधून दोन वर्षांची रिसर्च स्कॉलरशिप व मास्टर ऑफ सोशल सायन्सेस ही पदवी मिळवली. महाविद्यालयात असतानाच त्यांनी विविध स्पर्धा, एकांकिका आणि नाटकांतून काम करायला सुरुवात केली. नाटकाच्या आवडीतून हौशी नाटय़वेडय़ांना घेऊन ‘नटराज’ ही संस्था काढली. ग्लॅक्सो कंपनीतील नोकरी सांभाळून त्यांनी आपले नाटकवेड जपले.

भरत दाभोळकर यांनी दिग्दर्शित केलेल्या अनेक इंग्रजी नाटकांत त्यांनी काम केले. ‘हॅटखाली डोके असतेच असे नाही’, ‘मालकीण मालकीण दार उघड’, ‘हनिमून झालाच पाहिजे’, ‘जेव्हा यमाला डुलकी लागते’, ‘ती पाहताच बाला’, ‘ब्रम्हचारी असावा शेजारी’, ‘लागेबांधे’, ‘लैला ओ लैला’, ‘हँड्स अप’, ‘संभव असंभव’ ही त्यांची नाटके गाजली. बबन प्रभू आणि किशोर प्रधान ही जोडगोळी गाजली. त्यांनी 100 पेक्षा मराठी, हिंदी चित्रपट आणि 18 इंग्रजी नाटकांमध्ये काम केले.

रंगभूमीला ‘किशा’ मिळाला
‘काका किशाचा’ या नाटकाने त्यांना कलावंत आणि दिग्दर्शक म्हणून ओळख मिळवून दिली. यात आत्माराम भेंडे आणि शोभा प्रधान यांनीही काम केले होते. लेखक श्याम फडके यांच्या या नाटकाला राज्य नाटय़महोत्सव (1968), चिंतामणराव कोल्हटकर नाटय़स्पर्धेत आणि आळतेकर नाटय़स्पर्धेत पुरस्कार मिळाले. या नाटकामुळे त्यांचा व्यावसायिक रंगभूमीवरचा प्रवेश सुकर झाला.

आपली प्रतिक्रिया द्या