
सामना प्रतिनिधी। औसा
लामजना येथे नापिकीला कंटाळून एका शेतकऱ्याने आत्महत्या केली आहे. दत्तात्रय विश्वनाथ बलवंडे (37) असे त्याचे नाव आहे. शेतात मजुरी करून मिळवलेला पैसा दत्तात्रयने शेतात गुंतवला होता. पण नापिकी झाल्यामुळे त्याने घरात पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना शुक्रवारी पहाटे दोन वाजण्याच्या दरम्यान घडली आहे.
दत्तात्रय याची तीन एकर चार गुंठे कोरडवाहू जमीन आहे. घरात वृध्द आई आणि पत्नी असा परिवार आहे. हा कुटुंबांचा सर्वस्वी आधार होता. तो वर्षभर दुसऱ्याच्या शेतात मोलमजुरी करत होता. त्यातून आलेली रक्कम शेतात नांगरणी, कोळपणी त्यानंतर पेरणीसाठी वापरायचा.पिक चांगले उगवू लागले की त्यावर परत पोट मारून पैसे जमा करायचा व फवारणी करत होता. हा प्रकार गेली आठ वर्षे सतत सुरू होता. त्याने तूर, सोयाबीनची पेरणी केली होती. मात्र त्यात सोयाबीनला शेंगा लागल्या आणि पाऊस न झाल्याने शेंगा फुगल्याच नाहीत. त्यामुळे पिक हातचे निघून गेले. तसेच पावसाने दडी मारल्याने तूरही सुकून गेली. दिवाळी सारखा सर्वात मोठा सण समोर असताना खिशात रुपयाही नाही. यामुळे तो निराश झाला होता. त्यातूनच त्याने आत्महत्या केली.




























































