
हिंदुस्थान आणि पाकिस्तानने कश्मीरचा मुद्दा चर्चेतून सोडवायला हवा नाहीतर कश्मीरची अवस्था गाझासारखी होईल. इस्रायल गाझावर बॉम्बवर्षाव करत आहे. आपल्याकडेही तेच होईल, असे विधान नॅशनल कॉन्फरन्सचे प्रमुख फारुख अब्दुल्ला यांनी केले.
हिंदुस्थान आणि पाकिस्तानमधील वाद मिटवण्यासाठी दोन्ही देशांमध्ये कुठलीही चर्चा होताना दिसत नाही. दोन्ही देशांनी आपसात असलेले वाद मिटवण्यासाठी संवाद साधायला हवा, असे म्हणत अब्दुल्ला यांनी आपण पाकिस्तानशी चर्चा का करत नाही, असा प्रश्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विचारला.
आपण मित्र बदलू शकतो, परंतु आपल्याला आपला शेजारी बदलता येत नाही. शेजाऱयांशी मैत्री ठेवली तर दोघांचीही प्रगती होईल. हे शत्रुत्व कायम राहिले तर दोघेही मागे पडू, असे अटलबिहारी वाजपेयी म्हणायचे. युद्ध हा आता पर्याय असू शकत नाही. आम्ही चर्चेतून प्रश्न मार्गी लावू, असे मोदीही म्हणाले होते. या दोघांच्या वक्तव्यांकडे लक्ष वेधत अब्दुल्ला यांनी पाकिस्तानसोबत नव्याने चर्चा सुरू व्हावी, अशी मागणी केली.
नवाज शरीफ आता पाकिस्तानचे पंतप्रधान होणार आहेत. आधी इम्रान खान होते. इम्रान खान यांच्याप्रमाणेच शरीफही हिंदुस्थानशी चर्चेस तयार असल्याचे सांगत आहेत, परंतु आपण त्यांच्याशी चर्चा करत नाही. याचे कारण काय? आपण चर्चेतून प्रश्न सोडवले नाहीत तर आमचेसुद्धा गाझातल्या लोकांसारखेच हाल होतील. कश्मीरची अवस्था गाझा किंवा पॅलेस्टाईनसारखी होईल, असे अब्दुल्ला म्हणाले.






























































