
सामना प्रतिनिधी । मुंबई
परळ टर्मिनसचे रविवार, 3 मार्च रोजी उद्घाटन झाले आणि लागलीच प्रवाशांच्या संख्येत दहा हजाराने वाढ झाल्याचे आकडेवारी सांगत आहे. सध्या परळ टर्मिनसमधून 16 अप आणि 16 डाऊन परळ लोकल चालविण्यात येत असल्या तरी या स्थानकातून जलद लोकल चालविणे सध्या तरी अशक्य असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
बहुप्रतिक्षित परळ टर्मिनसचे लोकार्पण रेल्वेमंत्र्यांनी केले असले आणि त्यामुळे दादरची गर्दी परळ टर्मिनस खेचणार असे म्हटले जात आहे, मात्र दादरच्या लोकल काढून परळ येथून चालविण्यात येत असल्याने दादरकरांवर अन्याय झाल्याची भावना आहे. दादर येथील मध्य रेल्वेचा फलाट क्र. 1 अत्यंत अरुंद असून तेथे कायम डाऊन कल्याणच्या दिशेला जाणारी लोकल पकडण्यासाठी फलाटावर प्रचंड रेटारेटी आणि धक्काबुक्की होत असते. तसेच एक क्रमांकाचा फलाट संपण्यापूर्वी पादचारी पुलाचा उतार त्याला लागून असल्याने लोकल पकडण्यासाठी पादचारी पुलाच्या पायऱ्यांवरून धावत येणाऱ्या प्रवाशांचा ट्रेन पकडण्याच्या नादात ट्रेनखाली सापडून मृत्यू झाला आहे.
दादरची गर्दी वाढली
सकाळची 9.07 वाजताची कल्याण-दादर लोकल परळ लोकल केल्याने गाडी कल्याणलाच भरत असून डोंबिवलीत त्यात चढायला मिळत नाही. बहुतेक दादर लोकल रद्द करून परळ लोकल केल्याने दादरला गाडय़ांना गर्दी होत आहे. परळसाठी वेगळय़ा स्वतंत्र लोकल का नाही दिल्या, असा सवाल प्रवासी बळीराम राणे यांनी केला आहे.
तारीख प्रवासी संख्या
28 फेब्रु. 29, 980
4 मार्च 31, 613
5 मार्च 40, 600
40 हजार 600 प्रवासी
मध्य रेल्वेच्या दादर स्थानकात दरदिवशी सरासरी 1 लाख 25 हजार प्रवाशांची नोंदणी होते. परळ टर्मिनस कार्यरत होण्यापूर्वी 28 फेब्रुवारी रोजी तिकीट व पासखरेदीच्या आकडेवारीनुसार 29 हजार 980 प्रवाशांची नोंद झाली होती. परळ टर्मिनस खुले झाल्यानंतर पहिल्याच दिवशी सोमवार 4 मार्च रोजी 31 हजार 613 प्रवाशांची नोंद झाली, तर 5 मार्च रोजी त्यात नऊ हजाराने वाढ होत 40 हजार 600 प्रवाशांची नोंद झाली.


























































