पाय दाबले नाही म्हणून वृद्ध बापाची हत्या, कुख्यात गुंडाच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

नागपूरमध्ये धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पाय दाबले नाही म्हणून कुख्यात गुंडाने वडिलांची हत्या केल्याची घटना नवाबपुरा परिसरात घडली. याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा नोंद करण्यात आला असून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. दत्तात्रय शेंडे असे मयत व्यक्तीचे तर इंगा शेंडे असे आरोपीचे नाव आहे.

इंगा शेंडे हा कुख्यात गुंड असून काही दिवसांपूर्वीच तो तुरुंगातून बाहेर आला होता. शनिवारी दुपारी इंगाने आपल्या 62 वर्षीय वडिलांना पाय दाबण्यास सांगितले. वडिलांनी पाय दाबण्यास नकार दिल्याने इंगा संतापला. इंगाने संतापाच्या भरात वडिलांना बेदम मारहाण केली. यानंतर तो पसार झाला.

इंगाच्या चुलत भावांनी तात्काळ दत्तात्रय यांना रुग्णालयात नेले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. यानंतर कोतवाली पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली. कोतवाली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत घटनेचा पंचनामा केला. यानंतर हत्येचा गुन्हा दाखल करत गुंड इंगाला अटक केली आहे.