
सोशल मीडियात हॅकर्सनी भलतेच हातपाय पसरायला सुरुवात केली आहे. फेसबुक डाटाची सुरक्षा तर पूर्णपणे वाऱयावर असल्याची धक्कादायक माहिती एका अहवालातून समोर आली आहे. या अहवालानुसार, जवळपास 106 देशांतील तब्बल 53 कोटींहून अधिक फेसबुक युजर्सचा डाटा हॅकर्सनी चोरला आहे. यात हिंदुस्थानातील 60 लाख युजर्सचा समावेश आहे.
‘बिझनेस इनसाईडर’च्या अहवालात हा धक्कादायक खुलासा करण्यात आला आहे. हॅकर्सनी फेसबुक युजर्सचा फोन नंबर, फेसबुक आयडी, संपूर्ण नाव, पत्ता, जन्मतारीख आणि ईमेल आयडी अशा प्रकारचा महत्त्वपूर्ण डाटा चोरला आहे. यासंदर्भात एका हॅकर्सने दावा केला आहे. आपण 50 कोटींहून अधिक फेसबुक युजर्सचा डाटा इंटरनेटवर मोफत पुरवत आहे. डाटा काही ‘युरो’मध्ये विकला जात आहे. हॅकर्सच्या विविध साईट्सवर या डाटाची विक्री केली जात असल्याने सोशल मीडियात प्रचंड खळबळ उडाली आहे. ज्या युजर्सचा फेसबुक डाटा लीक झाला आहे, त्यात कोणकोणत्या देशांचे किती युजर्स आहेत, याचा उलगडा अहवालात करण्यात आलेला नाही.
हॅकर्सकडून आणखी सायबर अॅटॅक होण्याची शक्यता
फेसबुकला टार्गेट करणाऱया हॅकर्सकडून आणखी सायबर अॅटॅक केले जाण्याची शक्यता तज्ञांनी वर्तवली आहे. याबाबत इस्रायली सायबर क्राईम इंटेलिजन्स फर्म हडसन रॉकचे सहसंस्थापक एलन गल यांनी सावध केले आहे. हॅकर्स पुढील काही महिन्यांत आणखी युजर्सचा डाटा चोरू शकतात, असे गल यांनी म्हटले आहे. दरम्यान, फेसबुकने हा जुना डाटा असल्याचे स्पष्टीकरण दिले आहे.




























































