
अत्यंत प्रतिष्ठेची समजली जाणारी ‘फेमिना मिस इंडिया’ सौंदर्य स्पर्धा सलग दुसऱ्यांदा व्हर्च्युअल माध्यमातून रंगणार आहे. 14 फेब्रुवारीपासून स्पर्धकांच्या शोधमोहिमेला सुरुवात झाली आहे. देशभरातील 28 राज्ये आणि दिल्ली, जम्मू आणि कश्मीरमधून प्रत्येकी एका प्रतिनिधीची निवड केली जाणार आहे. अशा एकूण 31 जणींमध्ये ‘मिस इंडिया’ मुकुटासाठी चुरस होणार आहे.
‘मिस इंडिया’ स्पर्धेला सहा दशकांचा वारसा आहे. या स्पर्धेतून पुढे आलेल्या सौंदर्यवती फॅशन आणि ग्लॅमरच्या जगात आयकॉन्स ठरल्या आहेत. या स्पर्धेने देशाला आजवर सहा मिस वर्ल्ड दिल्या आहेत. रिटा फारिया, ऐश्वर्या राय, डायना हेडन, युक्ता मुखी, प्रियंका चोप्रा आणि मानुषी छिल्लर अशी या जगतसुंदरींची नावे आहेत. ‘फेमिना मिस इंडिया 2022’ स्पर्धेत सहभागी होण्यासाठी इच्छुक उमेदवाराला मोज अॅप डाऊनलोड करावे लागेल. त्यावर आपले प्रोफाईल तयार करून तीन ऑडिशन व्हिडीओज (इंट्रोडक्शन, टॅलेंट आणि रॅम्पवॉक) अपलोड करावे लागतील. ही सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यावर उमेदवाराला www.missindia.com या वेबसाईटवर लॉग इन करून पुढील माहिती भरावी लागेल.






























































