
सर्वाधिक पाच वेळा जगज्जेते पद पटकाविणाऱया ब्राझीलने आपल्या लौकिकास जागत सलग आठव्यांदा फिफा वर्ल्ड कपच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक दिली. मंगळवारी मध्यरात्रीनंतर उपउपांत्यपूर्व लढतीत सैराट झालेल्या ब्राझीलने अवघ्या 36 मिनिटांत 4 गोल ठोकले. जेतेपदासाठी नेहमीच प्रबळ दावेदार असलेल्या या संघाने दक्षिण कोरियाचा 4-1 गोलफरकाने धुव्वा उडवीत आपले नाणे खणखणीत वाजून दाखविले. प्रत्येक गोलनंतर ब्राझिलियन खेळाडूंचे विजयनृत्य आणि सामन्यानंतर गंभीर आजारी असलेले फुटबॉलपटू पेले यांना पाठिंबा व्यक्त करून ब्राझील संघाने जगभरातील चाहत्यांची मने जिंकली. मात्र आता उपांत्यपूर्व लढतीत ब्राझीलपुढे गतउपविजेत्या क्रोएशियाचे आव्हान असेल.
हिरव्यागार मैदानावर पिवळ्याधमक जर्सी घालून सैराट झालेल्या ब्राझीलच्या गोलधमाक्याने चाहत्यांना पैसा वसूल सामना बघायला मिळाला. ब्राझिलियन खेळाडूंनी पहिल्या मिनिटापासून दक्षिण कोरियावर वर्चस्व गाजवायला सुरुवात केली. यंदाच्या वर्ल्ड कपमधील नवा स्टार विनिशियस ज्युनियरने 7व्या मिनिटाला गोल करून ब्राझीलचे खाते उघडले. राफिन्हाच्या क्रॉसवर त्याने केलेला गोल भन्नाट होता. त्यानंतर ब्राझीलचा हुकमी एक्का नेयमारने मिळालेल्या पेनल्टीवर गोल करीत आपल्या संघाला 2-0 आघाडीवर नेले. मग 29व्या मिनिटाला रिचार्लिसनने चेंडूवर सुरेख नियंत्रण मिळवत कोरियन पेनल्टी क्षेत्रात मुसंडी मारली आणि थियागो सिल्लाकडून मिळालेल्या पासवर गोल करीत ब्राझीलची आघाडी 3-0 अशी भक्कम केली. कोरियन संघाला सावरण्याच्या आत लुकास पाकेटाने वेगवान गोल करीत ब्राझीलची आघाडी 4-0 अशी आणखी भरभक्कम केली.
पूर्वार्धात मोठी मुसंडी मारल्यानंतर मध्यंतरानंतर ब्राझीलचे खेळाडू मैदानावर थोडे रिलॅक्स दिसले. मात्र दक्षिण कोरियाच्या खेळाडूंनी खेळात सुधारणा केली. त्यांनी ब्राझीलच्या गोलपोस्टवर अनेक हल्ले केले. मात्र गोलरक्षक एलिसनने हे सर्व हल्ले परतावून लावले. मात्र पाईक सियुंगने 76व्या मिनिटाला गोल करून दक्षिण कोरियाने खाते उघडले. त्यानंतर कोरियन खेळाडूंना गोल करता आले नाहीत.
रिचार्लीसन ब्राझीलचा नवा स्टार
गेल्या काही वर्षांपासून नेयमार हाच ब्राझीलचा स्टार फुटबॉलपटू होता. मात्र ब्राझीलचा संघ केवळ नेयमारवर अवलंबून नाही हे यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये दिसले. कारण रिचार्लीसन या ब्राझीलच्या नव्या स्टारने यंदा लक्षवेधी कामगिरी केली. त्याने सर्बियाविरुद्ध दोन्ही गोल केले होते. त्यातील बायसिकल किक मारून केलेला दुसरा गोल अजूनही या स्पर्धेतील सर्वोत्तम गोल होय. कोरियाविरुद्धच्या लढतीत रिचार्लिसनकडे फुटबॉल आल्यानंतर त्याला चारही बाजूने प्रतिस्पर्धी खेळाडूंनी घेरलं होतं. त्याने चार वेळा डोक्याने फुटबॉल वर उडवला आणि दुसऱया खेळाडूकडे पास केला. त्यानंतर पुन्हा फुटबॉल आपल्याकडे येताच एका कोरियन बचावपटूला चकवत त्याने मुसंडी मारली आणि अप्रतिम गोल झळकवला.
ब्राझीलचा सेलिब्रेशन डान्स
प्रत्येक गोलनंतर ब्राझिलियन खेळाडूंनी एकत्र येऊन खास शैलीत केलेल्या नृत्यामुळे चाहते अक्षरशः बेभान झाले होते. या नृत्यात ब्राझिलियन खेळाडूंनी प्रशिक्षक टिटे यांनाही सहभागी करून घेतले. ‘पिजन डान्स’ सोडल्यास बाकीचे नृत्यप्रकार ब्राझीलच्या सांबा संस्कृतीशी जवळीक सांगणारे होते. मैदानावर गोल करून अशा प्रकारे नृत्य सेलिब्रेशन केल्यामुळे या सामन्याला एखाद्या म्युझिक कन्सर्टचे स्वरूप प्राप्त झाले. ब्राझील संघाने यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये गोल केल्यानंतर डान्स करण्याचे दहा प्रकार शिकले आहेत.

























































