
क्षणाक्षणाला उत्कंठा वाढवणाऱ्या, हृदयाचे ठोके चुकविणाऱया फिफा वर्ल्डकपच्या उपांत्यपूर्व लढतीच्या सस्पेन्स थ्रिलरचे विजयाचे कोडे लौतारो मार्टिनेझच्या पेनल्टी किकने उघडले. अनपेक्षितपणे सामन्यात बरोबरी साधल्यामुळे पेनल्टी शूटआऊटपर्यंत पोहोचलेल्या थरारातही अर्जेंटिनाची शेवटची किक रोखून बरोबरी साधण्यासाठी सज्ज झालेल्या डचला अर्जेंटिनाच्या लौतारो मार्टिनेझने गोल्डन किकने स्पर्धेबाहेर फेकले. अर्जेटिनाने उपांत्यपूर्व फेरीतले पेनल्टी शूटआऊटचे युद्ध 4-3असे जिंकत फिफा वर्ल्ड कपच्या उपांत्य फेरीत सहाव्यांदा धडक मारली, तर डच संघाचे पुन्हा एकदा फिफा वर्ल्ड कप जगज्जेत्याचे स्वप्न उद्ध्वस्त झाले. आता अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी अर्जेंटिनाला येत्या बुधवारी क्रोएशियाचा पाडाव करावा लागणार आहे.
आजचा उपांत्यपूर्व सामना स्पर्धेतला सर्वेत्तम सामना ठरला. अत्यंत अटीतटीच्या लढतीत नेदरलॅण्ड्सने चेंडूवर जास्त ताबा मिळविला असला तरी त्यांच्या गोलपोस्टवर सर्वाधिक हल्ले अर्जेंटिनाने चढवले. परिणामतः मध्यंतराला 1-0ने आघाडीवर असलेल्या अर्जेंटिनाला 73 व्या मिनिटाला मिळालेल्या पेनल्टीवर लिओनल मेस्सीने गोल ठोकून दिला. 2-0 या आघाडीनंतर अर्जेंटिनाचा विजय निश्चित वाटत होता, पण 78व्या मिनिटाला बदली म्हणून आलेल्या वाउट वेगहर्स्टने न भूतो न भविष्यति अशी कामगिरी करीत 83 आणि सामना संपायला काही सेकंद असताना गोल करून बरोबरी साधून दिली.
पेनल्टीतही ठोके वाढले…
2-2 अशा बरोबरीनंतर सुरू झालेल्या पेनल्टी शूटआऊटचा शेवटही अनपेक्षितच होता. अर्जेंटिनाचा गोलरक्षक इमिलानो मार्टिनेझने वर्जल वन डायकची पेनल्टी रोखली, मग स्टीव्हन बर्गहाईसची किक अडवून अर्जेंटिनाला 2-0 अशी आघाडी मिळवून दिली होती. दुसरीकडे मेस्सी आणि पॅरेडेझने पेनल्टीवर गोल करून सामन्यावर पकड निर्माण केली होती. पण त्यानंतर डचच्या कूपमेनर्स, वेगहर्स्ट आणि लूक द याँगने सलग तीन यशस्वी पेनल्टी मारल्या, तर दुसरीकडे डचच्या गोलरक्षकाने अर्जेंटिनाच्या फर्नांडेझच्या पेनल्टीला शून्य करत सामन्याचा क्लायमॅक्स 3-3 असा थरारक केला होता. शेवटची निर्णायक किक मार्टिनेझकडे होती आणि त्याने अफलातून गोल करीत अर्जेटिनाला 4-3 असा थरारक विजय मिळवून दिला.

























































