
सामना प्रतिनिधी । मुंबई
चेंबूर येथील एस्सेल स्टुडिओत असलेल्या ‘झिंग झिंग झिंगाट’ या मराठी मालिकेच्या सेटला अचानक आग लागली. शूटिंग सुरू असतानाच आग लागल्याने सेटवर असलेल्या कलाकारांची मोठी धावपळ उडाली. या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी सेटवरील साहित्य जळाल्याने मोठे नुकसान झाले आहे. मुंबईत सुरू असलेले आगीचे सत्र अद्याप थांबलेले नाही. ‘झी मराठी’ वाहिनीवर प्रसारित होणाऱया ‘झिंग झिंग झिंगाट’ या मालिकेचे शूटिंग चेंबूरच्या एस्सेल स्टुडिओत सुरू आहे. आज नेहमीप्रमाणेच शूटिंग सुरू असताना सेटवरच आग लागली तेव्हा मालिकेचे सूत्रसंचालक आदेश बांदेकर यांच्यासह 100-150 कलाकार आणि कर्मचारी सेटवर होते. आग लागल्याचे समजताच उपस्थितांनी प्रसंगावधान राखत अग्निशमन साधनांच्या मदतीने तत्काळ आगीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, आगीचे कारण स्पष्ट होऊ शकलेले नाही.































































