महापालिका विद्यार्थ्यांचा शाळेचा पहिला दिवस जुन्याच गणवेशात, पालिकेकडून आताच दिलीय शालेय वस्तूंची ऑर्डर

मुंबई पालिकेच्या शाळा 15 जूनपासून सुरू होत असताना शिक्षण विभागाकडून पुरवण्यात येणाऱया 27 वस्तूंची वर्क ऑर्डर नुकतीच दिल्याचे समोर आले आहे. त्यामुळे पालिका विद्यार्थ्यांच्या शाळेचा पहिला दिवस जुन्याच गणवेशात जाणार असल्याचे समोर आले आहे. तर शिक्षण विभागाने मात्र विद्यार्थ्यांना 15 जूनपर्यंत सर्व 27 वस्तू देण्याचा प्रयत्न करणार असल्याचा दावा करण्यात आला आहे.

मुंबई महानगरपालिकेत शिकणाऱया विद्यार्थ्यांना पालिकेकडून 27 शालेय वस्तूंचा मोफत पुरवठा केला जातो. शिवाय पालिकेच्या विद्यार्थ्यांना ‘बेस्ट’मधून मोफत प्रवासाची सोयही दिली जाते. या वर्षी पालिकेच्या शाळा 13 जूनपासून तर काही शाळा 15 जूनपासून सुरू होत असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्या दिवशीच शालेय वस्तू मिळाव्यात अशी अपेक्षा विद्यार्थी-पालकांकडून व्यक्त केली जात आहे.

सर्व वस्तूंसाठी ऑगस्ट उजाडणार?

गणवेश, वह्या, बूट, मोजे, दप्तर, स्टेशनरी तसेच छत्र्या व रेनकोट आदी शैक्षणिक वस्तूंचा पुरवठा सन 2007 पासून मुंबई महापालिकेच्या शाळांतील विद्यार्थ्यांना करण्यात येत आहे, मात्र अनेक वेळा शालेय विद्यार्थ्यांना पहिल्या दिवशी वस्तू मिळाल्या नसल्याचेच समोर आले आहे. यावर्षीदेखील जूनच्या सुरुवातीला वर्क ऑर्डर देण्यात आली असून सर्व वस्तू मिळण्यासाठी ऑगस्ट उजाडणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.