
सामना प्रतिनिधी । मुंबई
सर्वसाधारण गुणवत्ता यादीत प्रवेश मिळालेले २ लाख ३१ हजार १४० विद्यार्थी अकरावी प्रवेशाच्या रांगेत असून या विद्यार्थ्यांसाठी सायन्स, कॉमर्स आणि आर्टस् शाखेची पहिली गुणवत्ता यादी आज सकाळी ११ वाजता ऑनलाइन जाहीर होणार आहे. यंदा ९० व त्यापेक्षा जास्त गुण मिळविणाऱया विद्यार्थ्यांची संख्या वाढली असून नव्वदीपार असलेल्या १६ हजार ४६६ विद्यार्थ्यांची पहिल्या यादीत वर्णी लागण्याची चिन्हे आहेत.
९० टक्क्यांहून जास्त गुण मिळविणाऱया विद्यार्थ्यांची संख्या यंदा वाढल्याने पहिली यादी ९० टक्क्यांवरच क्लोज होईल अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. या यादीत नाव आलेल्या विद्यार्थ्यांनी ६ ते ९ जुलै या कालावधीत सकाळी ११ ते सायंकाळी ५ या वेळेत संबंधित कॉलेजमध्ये जाऊन आपला प्रवेश घ्यायचा आहे. त्यानंतर १० जुलैला सकाळी ११ वाजता पहिल्या यादीनंतर रिक्त राहिलेल्या जागांचा तपशील जाहीर होणार असून पहिल्या प्रवेश फेरीतील कटऑफही प्रसिद्ध केले जाणार आहेत.
दुसऱया गुणवत्ता यादीसाठी अर्ज भरण्याची मुदत १० व ११ जुलै सकाळी ११ ते सायंकाळी ५ पर्यंत देण्यात आली असून १३ जुलैला दुपारी ४ वाजता दुसरी यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. अकरावीच्या सायन्स, कॉमर्स, आर्टस् शाखेच्या नियमित चार फेऱया होणार असून या फेऱयामध्ये प्रवेश घेणाऱया विद्यार्थ्यांना बायफोकल शाखेत प्रवेश हवा असल्यास बायफोकलच्या रिक्त जागांसाठी कॉलेजस्तरावर अर्ज घेऊन आरक्षण आणि गुणवत्तेनुसार प्रवेश मिळणार आहेत.
शाखानिहाय आलेले अर्ज
आर्टस् – १९ हजार ४००
कॉमर्स – १ लाख४३ हजार ३६८
सायन्स – ६६ हजार ८८७
एमसीव्हीसी – १ हजार ४८५


























































