ईदच्या कार्यक्रमात तरुणींवर निर्वस्त्र नाचण्याची जबरदस्ती, पाच जणांना अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । गुवाहाटी

आसाममध्ये कार्यक्रमात आपली नृत्यकला सादर करण्यासाठी आलेल्या तरुणींवर निर्वस्त्र नाचण्यासाठी जबरदस्ती करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. ईदच्या दिवशी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं. याप्रकरणी पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे. राष्ट्रीय महिला आयोगानेही या प्रकरणी दखल घेत आसाम सरकारकडे चौकशीची मागणी केली आहे.

7 जून रोजी कामरुप जिल्ह्यात ईदनिमित्त एका सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी आयोजकांनी नर्तिकांच्या एका ग्रुपला कला सादर करण्यासाठी बोलावले होते. या कार्यक्रमासाठी त्यांना 37 हजार रुपये मानधन देण्यात आले होते. कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी आयोजकांनी 8 तरूणींना निर्वस्त्र होऊन नाचण्यासाठी सांगितले. जेव्हा मुलींनी नकार दिला तेव्हा आयोजकांनी त्यांच्यावर दबाव टाकण्यास सुरूवात केली. या संधीचा फायदा काही प्रेक्षकांनी आपला विनयभंग केल्याची तक्रारही या तरुणींनी केली आहे.

उपस्थित जमावाने या मुलींचे कपडे फाडण्यास सुरूवात केली. निर्वस्त्र न नाचल्यास ठार मारू अशी धमकीही प्रेक्षकांनी आणि आयोजकांनी द्यायला सुरुवात केली होती. या प्रकाराने घाबरलेल्या तरुणींपैकी एकीने पोलिसांना फोन केला. पोलिसांनी तातडीने घटनास्थळ गाठत या तरुणींची सुटका केली.

आयोजकांनी प्रेक्षकांमध्ये जाहीर केले होते की, निर्वस्त्र नाचण्यासाठी पश्चिम बंगालमधून मुलींचा ग्रुप बोलावला आहे. मात्र त्यांनी ज्या ग्रुपला बोलावलं होतं, तो अश्लील नृत्य करणारा नव्हता. प्रेक्षकांसमोर आपली बेईज्जती होईल, आपल्याला ते त्रास देतील या भीतीने आयोजकांनी या तरुणींवर कपडे काढून नाचण्यासाठी जबरदस्ती केली होती असं पोलिसांना कळालं आहे. या प्रकरणातील आरोपींना शिक्षा होणारच असे आश्वासन आसामचे अर्थमंत्री हेमंता बिस्वा शर्मा यांनी दिले आहे.