एआयएफसीच्या चेअरमनपदी आदित्य ठाकरे, हिंदुस्थानातील फुटबॉल प्रशिक्षकांच्या प्रगतीसाठी घेणार पुढाकार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महाराष्ट्र राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांची असोसिएशन ऑफ इंडियन फुटबॉल कोचेस (एआयएफसी) या संघटनेच्या चेअरमनपदी नियुक्ती झाली आहे. मुंबईतील फुटबॉलला सुवर्ण झळाळी देणारे आदित्य ठाकरे आता हिंदुस्थानातील फुटबॉल प्रशिक्षकांच्या प्रगतीसाठी पुढाकार घेणार आहेत.

एआयएफसीचे संस्थापक दिनेश नायर, हिंदुस्थानी फुटबॉल संघाचे माजी खेळाडू स्टीव्हन डायस व मुंबई सिटी एफसीचे डेव्हलपमेंट अधिकारी तनाझ मोहम्मद यांच्या हस्ते आदित्य ठाकरे यांना चेअरमनपदी नियुक्त झालेले पत्र सुपूर्द करण्यात आले. दरम्यान, दिनेश नायर यावेळी म्हणाले की, आदित्य ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबईतील फुटबॉलला सुवर्ण झळाळी मिळालीय. आता त्यांच्या सान्निध्यात हिंदुस्थानातील फुटबॉल प्रशिक्षकांचाही विकास होणार हे निश्चित आहे.

हिंदुस्थानी फुटबॉलला उंचीवर न्यायचेय – आदित्य ठाकरे

एआयएफसी चेअरमनपदी नियुक्त झाल्यानंतर आदित्य ठाकरे यांनी हिंदुस्थानी फुटबॉलला उंचीवर नेण्यासाठी सर्वांनी मिळून काम करायला हवे असे नमूद केले. याप्रसंगी ते म्हणाले, एआयएफसीसोबत फुटबॉलच्या विकासासाठी काम करायचे आहे. हिंदुस्थानी फुटबॉलला प्रगतिपथावर नेण्याचे सर्वांचेच ध्येय आहे. यासाठीच प्रयत्न करण्यात येणार आहेत.