अवयवदानाची ‘गरुडा’भरारी; ‘आयआयटी’ तयार करतेय विशेष ड्रोन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मंगेश सौंदाळकर । मुंबई

ब्रेनडेड झालेल्या रुग्णाचे अवयव एका रुग्णालयातून दुसऱ्या रुग्णालयात नेण्याकरिता होणारी कसरत आता थांबणार आहे. ‘मुंबई आयआयटी’ आणि ‘गामा रोटर’च्या माध्यमातून ‘गरुडा’ या विशेष ड्रोनच्या निर्मितीचे काम सुरू आहे. या ड्रोनच्या माध्यमातून अवयव सहजपणे एका रुग्णालयातून दुसऱ्या रुग्णालयात नेता येणार आहे.

प्रायोगिक तत्त्वावर या ड्रोनच्या निर्मितीचे काम सुरू आहे. हिंदुस्थानात दरवर्षी अनेक रुग्णांना अवयवाची गरज असते. अवयव मिळाल्यानंतर विमान प्रवासापासून ते ग्रीन कॉरिडॉर अशी प्रकिया पार पाडावी लागते. कित्येकदा तांत्रिक समस्येमुळे अवयव नेताना अडचणी येतात. विशेष म्हणजे मुंबई-सुरतकरिता ठरावीक विमान आहे. त्यामुळे ब्रेनडेड रुग्णाचे हृदय मिळाल्यावर ते नेताना अडचणींना सामोरे जावे लागते. याची दखल घेऊन ‘मुंबई आयआयटी’चे प्राध्यापक के. पी. करुणाकरन यांच्या मार्गदर्शनाखाली ‘गामा रोटर’चे अर्पण घोष, जे. प्रवीण कुमार, राजन सीतापुरा यांच्या चमूने गरुडा निर्मितीचे काम सुरू केले आहे.

गरुडाच्या निर्मितीकरिता प्रथम दोन हलक्या वजनाचे हेलिकॉप्टर घ्यावे लागणार आहेत. त्यानंतर हे विशेष ड्रोन तयार केले जाणार आहे. रशिया, जर्मनी येथे अशा प्रकारची सुविधा आहे. त्यामुळे  हिंदुस्थानात अवयवदानाच्या श्रेष्ठ कार्याकरिता गरुडा हे उपयुक्त ठरणार आहे.

अवयव ने-आण करण्यासाठी ‘गरुडा’ उपयुक्त ठरेल. प्रायोजिक तत्त्वावर गरुडाच्या निर्मितीचे काम सुरू आहे. रुग्णालयाच्या टेरेसवर सहजपणे उतरू शकते.

-प्रा. के. पी. करुणाकरन, मुंबई आयआयटी.

असे आहे गरुडा

  • ‘गरुडा’ची वजन क्षमता दीडशे किलोपर्यंत आहे.
  • हे एकआसनी ड्रोन असून ते 2-3 तास सहज हवेत उडेल.
  • गरुडाकरिता विशेष हेलिपॅडची गरज नाही. एका रुग्णालयाच्या टेरेसवरून दुसऱ्या रुग्णालयाच्या टेरेसवर ते सहज उतरू शकते. पुणे-सुरत-नाशिक एवढय़ा अंतरावर हे ड्रोन सहज प्रवास करेल
  • या ड्रोनच्या वापरामुळे भविष्यात ग्रीन कॉरिडॉर करण्याची गरज भासणार नाही.