फिफाची भविष्यवाणी करणाऱ्या ऑक्टोपसचा लोकांनी केला चट्टामट्टा!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । टोकियो

२०१० साली झालेल्या फिफा फुटबॉल विश्वचषकातली सगळ्यात भन्नाट गोष्ट कुठली असं विचारलं तर एक उत्तर ठरलेलं असेल. ते म्हणजे पॉलबाबा. २०१०च्या फुटबॉलच्या विश्वचषकात ऑक्टोपस पॉलबाबाने चांगलीच लोकप्रियता मिळवली होती. असाच आणखी एक ऑक्टोपस यंदाच्या फिफात प्रसिद्ध झाला होता. पण, भविष्यवाणी अचूक ठरूनही त्याला एखाद्या साधारण माशाप्रमाणे विकण्यात आलं असून लोकांनी त्याचा चट्टामट्टा केल्याचीही चर्चा रंगत आहे.

या ऑक्टोपसचं नाव रॅबिओट असं होतं. रॅबिओटने यंदाच्या मोसमात अचूक भविष्य वर्तवलं होतं. कोलंबिया, पोलंड आणि सेनेगल विरुद्धच्या सामन्यांमध्ये जपानच्या स्थितीविषयी त्याने भविष्य सांगितलं होतं. ही भविष्यवाणी खरी ठरली होती. यंदाच्या विश्वचषकात जपान चांगली कामगिरी करेल अशीही भविष्यवाणी त्याने केली होती. मात्र, जपान बेल्जिअमसोबत हरल्यानंतर रॅबिओटला एखाद्या सामान्य माशाप्रमाणे विकण्यात आलं. त्यानंतर विकत घेणाऱ्या कुटुंबाने त्याला शिजवून खाऊनही टाकलं.

रॅबिओटची भविष्य वर्तवण्याची पद्धतही वेगळी होती. एका पूलमध्ये तीन बास्केट ठेवलेले असत. त्यातील एकावर जपानचं नाव, दुसऱ्यावर प्रतिस्पर्धी तर तिसऱ्यावर ड्रॉ असं लिहिलेलं असे. रॅबिओट ज्या बास्केटच्या दिशेने पोहायचा, ती त्याची भविष्यवाणी मानली जात होती.