मोबाईल टॉवरच्या बॅटर्‍या चोरणार्‍या चारजणांना अटक; साडेअकरा लाखांचा मुद्देमाल जप्त

मोबाईल इंडस टॉवरच्या बॅटर्‍या चोरणार्‍या चारजणांना अटक करण्यात आली. त्यांनी चोरलेल्या 20 बॅटर्‍या व गुन्ह्यात वापरलेले वाहन महींद्रा पिकअप बोलेरो, इंडीका कार व एक स्कुटी असा एकूण 11,64,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याबाबत 24-1-23 रोजी तक्रारदार महादेव पंडीत ढवण यांनी पोलीस ठाणे कासार सिरसी येथे लेखी तक्रार दिली होती. 22-1-23 रोजी रात्री 10.45 ते 11.55 वाजण्याच्या सुमारास भंगार चिंचोली येथील इंडस कंपनीचे मोबाईल टॉवरच्या सेल्टर रुमचे अज्ञात आरोपीतांनी लॉक तोडून आतमध्ये प्रवेश केला. आतमधील रॅकमध्ये ठेवलेल्या अमर राजा कंपनीच्या 20 बॅटरी सेल (किंमत सुमारे 14000 रुपये) मुद्देमाल चोरट्यांनी चोरुन नेला आहे.

या प्रकरणी पोलिसांनी शैलेश श्रीमंत सूर्यवंशी (वय 23, रा. विद्यानगर, निलंगा), सुदाम तानाजी हजारे (वय 18, रा. बिबराळ ता. शिरुर अनंतपाळ), भीम नागनाथ जाधव (वय 26, रा. शिवाजी नगर निलंगा), ज्ञानेश्वर निवृत्ती शिंदे (वय 50, रा. बोरसुरी ता. निलंगा) यांना अटक केली. चौघांनीही चोरीची कबुली दिली आहे. तसेच उस्तुरी येथे दिनांक 21-1-23 रोजी, हासोरी येथे दिनांक 19-1-23 रोजी इंडस टॉवरचे सेल्टर रुमचे लॉक तोडून आतमधील रॅकमध्ये ठेवलेल्या 24 बॅटर्‍या चोरी केल्याचे सांगितले. त्यांच्याकडून बॅटरी व गुन्ह्यासाठी वापरलेला पिकअप बोलेरो, इंडिका कार व एक स्कुटी असा एकूण 11,64,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.