
गणेशोत्सवानिमित्ताने शहरात सर्वत्र गर्दी झाली असून याच गर्दीचा गैरफायदा घेत मोबाईल चोरी करणार्या चौघांच्या टोळीला हडपसर पोलिसांनी अटक केली. आरोपींकडून महागडे तब्बल 20 मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. आरोपींनी फरासखाना, बंडगार्डन, स्वारगेट, हडपसर भागातून मोबाईल चोरले असून पकडण्यात आलेले आरोपी हे उत्तरप्रदेश, झारखंड, पश्चिम बंगालमधून आल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
कौशल मुन्ना रावत (वय – 21, रा. लखनौ, उत्तरप्रदेश), मंतोषसिंग श्रवण सिंह (वय – 22, रा. झारखंड), जोगेश्वर कुमार रतन महतो (वय – 30, रा. झारखंड), सुरज रामलाल महातो (वय – 30, रा. झारखंड) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. तर, त्यांच्या एका अल्पवयीन साथीदाराला ताब्यात घेण्यात आले आहे.
गणेशोत्सवात मंडळांचे देखावे पाहण्यासाठी मोठी गर्दी होते. शहराच्या मध्यभागासह उपनगरात देखील गर्दीचे प्रमाण मोठे आहे. या गर्दीत नागरिकांचे मोबाइल चोरणार्या चोरट्यांना पकडण्यासाठी पोलिसांनी विशेष पथक तयार केले आहे. त्यानुसार वरिष्ठ निरीक्षक रविंद्र शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली हडपसर पोलिसांचे पथक हद्दीत गस्तीवर होते.
या दरम्यान गर्दीत मोबाईल चोरी करणारे आरोपी हे गांधी चौकात थांबले असल्याची माहिती अंमलदार अजित मदने, प्रशांत टोणपे यांना मिळाली. त्यानुसार सहायक निरीक्षक विजयकुमार शिंदे, उपनिरीक्षक अविनाश शिंदे यांच्या पथकाने आरोपींना सापळा रचून ताब्यात घेतले. त्यांच्याकडून 3 लाख 80 हजार रुपयांचे चोरीचे 20 मोबाईल जप्त करण्यात आले. आरोपी हे लखनौ रेल्वे स्टेशनवर एकत्रित भेटले. त्यानंतर पुण्यात येवून त्यांनी गर्दीच्या ठिकाणी चोरी केल्याचे समोर आले आहे.
परिमंडळ पाचचे पोलीस उपायुक्त विक्रांत देशमुख, सहायक पोलीस आयुक्त आश्विनी राख यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक रविंद्र शेळके यांच्या पथकाने ही कामगिरी केली.





























































