जंगलातून भरकटलेला तरस घुसला सातारा शहरात, वन विभागाने रेस्क्यू ऑपरेशन राबवून घेतले ताब्यात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सातारा शहरात भरवस्तीत आज सकाळी तरस हा वन्यप्राणी घुसल्याने एकच घबराट उडाली. शहराच्या पश्चिम बाजूला लागून असलेल्या घनदाट जंगलातून भरकटत शहरात आलेल्या या तरसाला वन विभागाच्या पथकाने रेस्क्यू ऑपरेशन राबवून ताब्यात घेतले. आता त्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येणार आहे.

अजिंक्यतारा किल्ल्याला खेटून सातारा शहर वसले आहे, तर पश्चिमेला यवतेश्वराचा डोंगर असून, हा संपूर्ण परिसर घनदाट जंगलाने वेढलेला आहे. या जंगलातून आजवर बिबटय़ासह विविध वन्यप्राणी शहर परिसरात घुसल्याच्या घटना घडल्या आहेत. मात्र, आज एक भरकटलेला तरस पश्चिम बाजूकडून शहरातील मंगळवार पेठ, दस्तगीर कॉलनी परिसरात आला. जंगलाकडे परत जाण्याची वाट सापडत नसल्याने हा तरस सैरभैर होऊन सैरावैरा धावत होता. सकाळी सकाळी हा प्रकार निदर्शनास आल्याने परिसरातील नागरिकांमध्ये घबराट उडाली.

याबाबतची माहिती माजी उपनगराध्यक्ष सुहास राजेशिर्के यांनी वन विभागाला कळविली. त्यानंतर सकाळी आठच्या सुमारास पिंजरा व अन्य साहित्यासह वन विभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. या पथकाने सुमारे दोन तास रेस्क्यू ऑपरेशन राबवून तरसाला पकडले. त्याला पिंजऱयात घालून वन विभागाच्या कार्यालयाकडे नेण्यात आले. त्या ठिकाणी जिल्हा पशुवैद्यकीय अधिकाऱयांमार्फत त्याची वैद्यकीय तपासणी केली गेली. आता या तरसाला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येणार असल्याचे वन विभागाकडून सांगण्यात आले.

उपवनसंरक्षक महादेव मोहिते, सहायक वनसंरक्षक सुधीर सोनावणे, वनपरिक्षेत्र अधिकारी निवृत्ती चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली वन परिमंडल अधिकारी कुशल बावरा, वनरक्षक महेश सोनवणे, राज मोसलगी यांच्यासह सुहास राजेशिर्के, अमित सय्यद, ए. बी. यादव यांनी या रेस्क्यू ऑपरेशनमध्ये सहभाग घेतला होता.