फ्रान्समध्ये कोरोनाचा कहर, राष्ट्रपतींनी केली तिसऱ्या लॉकडाऊनची घोषणा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जगभरात कोरोना विषाणू पुन्हा डोके वर काढू लागला आहे. फ्रान्समध्येही कोरोनाचा कहर पुन्हा सुरू झाला असून बुधवारी 30 हजारांच्या जवळपास रुग्ण आढळले. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रपती इमॅन्यूएल मॅक्रो यांनी देशात तिसऱ्यांदा लॉकडाऊनची घोषणा केली आहे. कोरोनाचा वाढता धोका पाहता राष्ट्रपती मॅक्रो यांनी संपूर्ण देशात चार आठवड्यांचा लॉकडाऊन लागू केला आहे.

फ्रान्समध्ये कोरोना विषाणूची तिसरी लाट आली आहे. या पार्श्वभूमीवर बुधवारी राष्ट्रपती इमॅन्यूएल मॅक्रो यांनी लॉकडाऊनची घोषणा केली. कोरोनाचा वाढता धोका पाहता आताच पाऊल उचलले नाही तर तो अनियंत्रित होईल, असे राष्ट्रपती मॅक्रो म्हणाले.

तिसऱ्या लॉकडाऊनमध्ये शाळा कमीतकमी तीन आठवड्यांसाठी बंद राहणार आहेत. तसेच अत्यावश्यक सेवांची दुकाने वगळता सर्व दुकाने बंद राहणार आहे. कर्मचाऱ्यांना ऑफिसला न जाता वर्क फ्रॉम होम करण्याची मुभा देण्यात आली असून कोणत्याही व्यक्तीला 10 किलोमीटरहून अधिक लांब प्रवास करण्यास मज्जाव करण्यात आला आहे.

लसीकरणाला वेग येणार

दरम्यान, लॉकडाऊन दरम्यान वेगाने लसीकरण करण्यात येईल, असे राष्ट्रपती इमॅन्यूएल मॅक्रो म्हणाले. तसेच सरकार 18 वर्षांहून अधिक वयाच्या सर्व व्यक्तींना कोरोना लस टोचणार आहे. तसेच आता कठोर निर्णय घेण्याची वेळ आली आहे, असे म्हणत त्यांनी नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना एकप्रकारे इशारा दिला आहे.

हिंदुस्थानमध्येही कोरोनाचा प्रकोप वाढतोय

हिंदुस्थानमध्येही कोरोनाचा प्रकोप पुन्हा सुरू झाला आहे. महाराष्ट्र, छत्तीसगड, कर्नाटक, पंजाब, केरळ, तामिळनाडू, गुजरात आणि मध्य प्रदेश या आठ राज्यांमध्ये कोविडच्या दैनंदिन रुग्णसंख्येत मोठी वाढ सुरूच आहे. या 8 राज्यांमध्ये नवीन रुग्णांपैकी 84.61 टक्के रुग्ण आहेत. गेल्या 24 तासांत 72,330 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे.