फ्रान्सचा स्ट्रायकर बेंजेमा जायबंदी, अखेरचा वर्ल्ड कप खेळण्याचे स्वप्न भंगले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कतारमध्ये रविवारपासून ‘फुटबॉल-ए-जंग’ला प्रारंभ झाला. मात्र स्पर्धेला प्रारंभ होण्याच्या पूर्वसंध्येला फ्रान्सचा स्ट्रायकर करीम बेंजेमा जायबंदी झाल्याची दुर्दैवी बातमी येऊन धडकली. यामुळे बेंजेमाचे अखेरचा फुटबॉल वर्ल्ड कप खेळण्याचे स्वप्नही भंगले आहे.

करीम बेंजेमाच्या डाव्या मांडीला दुखापत झाल्याने तो स्पर्धेतून बाहेर गेलाय. त्याला बरे होण्यासाठी जवळपास तीन-चार आठवडे लागतील. डॉक्टरांनी त्याला विश्रांतीचा सल्ला दिला आहे. बेंजेमाला एक महिन्यापूर्वी फुटबॉलमधील सर्वात प्रतिष्ठsचा बॅलोन डी’ओर पुरस्कार मिळाला होता.

फ्रान्स संघाचे प्रशिक्षक डीडीएर डेस चॅम्प्स म्हणाले, ‘बेंजेमाच्या दुखापतीमुळे संघाला मोठा धक्का बसला आहे. त्याने विश्वचषक हे आपले लक्ष्य मानले होते. या दुखापतीनंतरही माझा संघावर पूर्ण विश्वास आहे. आव्हानाचा सामना करण्यासाठी आम्ही पूर्णपणे सज्ज आहोत.’

बेंजेमाचा अखेरचा वर्ल्ड कप हुकला

रिअल माद्रिदचा स्टार खेळाडू असलेल्या करीम बेंजेमा वादांमुळे मागील वर्ल्ड कपमध्ये खेळू शकला नव्हता. तब्बल आठ वर्षांनंतर पुन्हा एकदा त्याला विश्वचषक खेळण्याची संधी मिळाली होती, मात्र दुखापतीमुळे यावेळीही तो स्पर्धेला मुकलाय. 2014 मध्ये तो शेवटचा विश्वचषक खेळला होता. 34 वर्षीय बेंजेमा आगामी वर्ल्ड कपपर्यंत 38 वर्षांचा होईल. त्यामुळे त्याचा हा अखेरचाच वर्ल्ड कप होता, मात्र नियतीने यावेळीही त्याचे स्वप्न धुळीस मिळवले.

पाचव्या खेळाडूला दुखापत

विश्वचषक फुटबॉल स्पर्धेपूर्वी दुखापत झालेला करीम बेंजेमा हा फ्रान्सचा पाचवा खेळाडू ठरला आहे. त्याच्याआधी मिडफिल्डर एन’गोलो कांते आणि पॉल पोग्बा, एनकुकू आणि बचावपटू किम्पेम्बे यांनी दुखापतीमुळे स्पर्धेतून माघार घेतली आहे.