
वैद्यकीय कॅम्पच्या नावाखाली डॉक्टरची फसवणूक झाली आहे. फसवणूकप्रकरणी बोरिवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. बोरिवली येथे एक डॉक्टर राहत असून त्याचे फिजिओ थेरपीचे क्लिनिक आहे. जून महिन्यात त्याना एका महिलेचा फोन आला. तिने आपण सीआयएसएफमध्ये नोकरी करत असल्याचे भासवले. आपल्या 22 जवानांना उपचारासाठी क्लिनिकमध्ये पाठवायचे असल्याचे सांगून वैद्यकीय खर्चाबाबत विचारणा केली. तेव्हा डॉक्टराने एकूण खर्च 77 हजार रुपये येईल असे त्या महिलेला सांगितले. विश्वास बसावा म्हणून महिलेने उपचारासाठी येणाऱया जवानांची यादी पाठवली.
त्यानंतर डॉक्टरना एका नंबरवरून फोन आला. उपचाराचे पैसे पाठवण्यासाठी ई-वॉलेट उघडण्यास सांगितले. मदत करतो सांगून ठगाने डॉक्टरला व्हिडीओ कॉल करून कसे पैसे पाठवावे असे सांगितले. त्यावर विश्वास ठेवून डॉक्टरने पैसे भरले. खात्यातून 1 लाख 10 हजार रुपये गेल्याचे समजताच डॉक्टरना धक्काच बसला. त्याने बोरिवली पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली.



























































