सुप्त क्षयरोगाचा प्रसार रोखण्यासाठी ‘आयजीआरए’ मोफत चाचणी, 24 तासांत होणार निदान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबई महानगरपालिका सुप्त क्षयरोगाचा प्रसार रोखण्यासाठी रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींची मोफत आयजीआरए चाचणी सुरू केली आहे. ही रक्ताची चाचणी केल्यानंतर 24 तासांत टीबीचे निदान होत असून त्यामुळे मुंबई टीबीमुक्त करण्यासाठी महत्त्वाची भूमिका पार पाडणार आहे.

मुंबई हे देशातील सर्वांत मोठे आणि दाट लोकवस्तीचे शहर असून क्षयरोग प्रतिबंध करून मुंबई क्षयरोगमुक्त करण्यासाठी मुंबई महापालिकेच्यावतीने क्षयरुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींची आयजीआरए (इंटरफोर्न गॅमा रेडिओइम्युन अॅसे) ही अत्याधुनिक वैद्यकीय चाचणी मोफत सुरू केली आहे. क्षयरोग प्रतिबंधाच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल ठरणा-या या उपक्रमाची सुरुवात नुकतीच करण्यात आली आहे, अशी माहिती पालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी दिली.

सुप्त क्षयरोग म्हणजे काय

सुप्त क्षयरोगाची बाधा झालेल्या व्यक्तींच्या शरीरात क्षयरोगाचे जंतू सुप्तावस्थेत असतात. अशा बाधा झालेल्या व्यक्तींमध्ये क्षयरोगाची आढळणारी कोणतीही लक्षणे नसतात. मात्र, सुप्त क्षयरोगाने बाधित असलेल्या व्यक्तीमध्ये भविष्यात ‘सक्रीय क्षयरोग’ बळावण्याची शक्यता असते. त्यामुळे सुप्त क्षयरोगाचे वेळीच निदान होऊन त्यावर वेळच्यावेळी योग्य ते उपचार केल्यास संबंधीत व्यक्तीला भविष्यात सक्रीय क्षयरोग होण्यापासून प्रतिबंध होऊ शकतो.

प्रतिबंधात्मक उपाययोजना

– चाचणींनंतर टीबी नसेल तरी प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा भाग म्हणून त्या व्यक्तीची पुढील २ वर्षे पर्यंत नियमितपणे तपासणी करण्यात येणार आहे. तपासणी ६ महिन्यातून एकदा करण्यात येणार आहे.

– टीबी असेल तर त्यासाठीचे उपचार आठवड्यातून एकदा आणि एकूण १२ आठवडे दिले जाणार आहेत. क्षयरोग बाधेच्या अनुषंगाने पुढील २ वर्षे त्या व्यक्तीचा नियमितपणे पाठपुरावा केला जाणार आहे.