धारावीमध्ये मोफत मेगा लसीकरण मोहीम; दोन दिवसांत तब्बल दहा हजार जणांचे लसीकरण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनाच्या दुसऱया लाटेत धारावी तग धरून राहिली आहे. गेल्या काही दिवसांपासून येथील रुग्णसंख्या शून्यावर आली असतानाच आता या ठिकाणी मोठय़ा प्रमाणात लसीकरण मोहीम राबविली जात आहे. शिवसेना खासदार राहुल शेवाळे आणि श्री राधा फाऊंडेशनच्या वतीने आयोजित केलेल्या या लसीकरण मोहिमेत दोन दिवसांत तब्बल 10 हजार जणांचे लसीकरण करण्यात आले आहे.

धारावीत राबविण्यात आलेल्या या लसीकरण मोहिमेचा शुभारंभ खासदार राहुल शेवाळे यांच्या हस्ते नुकताच करण्यात आला. ही लसीकरण मोहीम आयसीआयसीआय लोम्बार्ड आणि सुराना हॉस्पिटलच्या सहाय्याने राबविण्यात आली. यावेळी आमदार सदा सरवणकर, नगरसेवक सुभाष नकाशे, विधानसभा समन्वयक विठ्ठल पवार यांच्यासह अन्य मानव्यर उपस्थित होते. कोरोनाच्या पहिल्या लाटेत धारावी हा मुंबईतील कोरोनाचा हॉटस्पॉट ठरला होता. मात्र राज्य सरकार, मुंबई मनपा, स्थानिक लोकप्रतिनिधी, सामाजिक संस्था आणि स्थानिक जनता यांच्या एकत्रित प्रयत्नांनी धारावीने यशस्वीरीत्या कोरोनावर मात केली. त्यानंतर आता कोरोना लसीकरणाबाबतीतही आघाडी घेत सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

राज्य सरकार आणि मुंबई महानगरपालिकेच्या वतीने धारावीमध्ये मोफत कोरोना लसीकरण केले जात आहे. मात्र, दाट लोकसंख्येच्या धारावीतील लसीकरण प्रक्रियेला आणखी गती मिळावी आणि सरकारी यंत्रणांवरील भार काही प्रमाणात कमी व्हावा या हेतूने आयसीआयसीआय लोम्बार्डच्या सहाय्याने मेगा लसीकरण मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या काळात अशाच रीतीने मोठय़ा प्रमाणात धारावीकरांचे लसीकरण करण्याचा आमचा मानस आहे.
-खासदार राहुल शेवाळे