
गतविजेता, विक्रमी विजेता आणि विजेतेपदाचा दावेदार असलेले तीन दिग्गज रोलॅण्ड गॅरोसच्या लाल मातीतून गायब झाल्यामुळे जर्मनीच्या अॅलेक्झांडर झ्वेरेवसाठी ग्रॅण्डस्लॅम स्वप्नपूर्तीची संधी लाभली आहे. त्याने आज झालेल्या उपांत्यपूर्व सामन्यात स्पॅनिश राफाएल ओदारचा सरळ सेट्समध्ये पराभव करत फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेच्या ग्रॅण्डस्लॅमच्या दिशेने झेप घेतली आहे.
आजवर एकही ग्रॅण्डस्लॅम टेनिस स्पर्धा न जिंकलेल्या झ्वेरेवने आतापर्यंत अमेरिकन ओपन (2020), फ्रेंच ओपन (2024) आणि ऑस्ट्रेलियन ओपन (2025) या तीन ग्रॅण्डस्लॅम टेनिस स्पर्धांची अंतिम फेरी गाठलीय आणि तिन्ही वेळेला त्याला उपविजेतेपदावरच समाधान मानावे लागले होते. मात्र यावेळी दैवानेच त्याच्यासाठी ग्रॅण्डस्लॅम जेतेपदाचा घाट घातला आहे. टेनिस विश्वातील तीन दिग्गज जोकोविच, अल्काराझ आणि सिनर हे या स्पर्धेतून बाद झाले आहेत. या घडीला झ्वेरेवपेक्षा वरचढ खेळाडू कुणीही नसल्यामुळे त्याला पहिलेवहिले ग्रॅण्डस्लॅम जेतेपदाची संधी प्राप्त झाली आहे. त्याने आज झालेल्या सामन्यात ओदारचा 7-6 (7-3), 6-1, 6-3 असा सहज फडशा पाडला. त्यामुळे उपांत्य फेरीत त्याची लढत याकुब मेनसिक आणि जोआओ फोन्सेका यांच्यातील विजयी खेळाडूशी पडेल. त्याचप्रमाणे अन्य उपांत्यपूर्व लढतीत फेलिक्स ऑगर-फ्लाविओ कोबोली आणि मॅटिओ बेरीटेनी-मॅटिओ अरनाल्डी अशी झुंज रंगेल.
कोस्त्युक, आंद्रेइवा उपांत्य फेरीत
महिला एकेरीत युव्रेनच्या मार्ता कोत्स्युकने आपल्याच देशाच्या एलिना स्वितोलिनाचा संघर्षपूर्ण लढतीत 6-2, 2-6, 6-2 असा पराभव करत उपांत्य फेरी गाठली. तसेच रशियाच्या मिरा आंद्रेइवाने रोमानियन सोराना किरस्त्याचा 6-0, 6-3 असा धुव्वा उडवला. आता गुरुवारी या दोघीच अंतिम फेरीसाठी एकमेकाRसमोर उभ्या ठाकणार आहेत.

























































