मालवण शिवसेनेच्या वतीने ‘गजर बाळासाहेबांचा’ संगीत भजन स्पर्धा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मालवण

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त मालवण तालुका शिवसेनेच्या वतीने विविध सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती तालुकाप्रमुख तथा जिल्हा परिषद सदस्य हरी खोबरेकर यांनी दिली.

दि. २३ जानेवारी रोजी सकाळी बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्याचे अनावरण केले जाणार आहे. त्यानिमित्त शहरात जंगी स्वागत रॅली काढण्यात येणार आहे. त्यानंतर शिवसेना शहर शाखेत पुतळ्याचे पूजन केले जाणार आहे. तर रात्रौ ७ ते १० या वेळेत आयोजित करण्यात आलेली ‘गजर बाळासाहेबांचा’ ही संगीत भजन स्पर्धा जयंती सोहळ्याचे आकर्षण असणार आहे.

मालवण येथील शिवसेनेच्या तालुका कार्यालयात पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी उपतालुकाप्रमुख गणेश कुडाळकर, शहर प्रमुख बाबी जोगी, माजी नगरसेवक महेंद्र म्हाडगूत, बंड्या सरमळकर, महेश शिरपुटे, अक्षय रेवंडकर, दत्ता पोईपकर आदी उपस्थित होते.

हरी खोबरेकर म्हणाले, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची २३ जानेवारी रोजी जयंती साजरी होत आहे. यानिमित्त शिवसेना जिल्हाप्रमुख आमदार वैभव नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली मालवण तालुक्यात जयंती आठवडा साजरा करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. शिवसेनेच्या वतीने प्रत्येक विभागात विविध कार्यक्रम घेण्यात येणार आहेत. तर २२ रोजी सकाळी १० वाजता युवासेनेच्या वतीने मामा वरेरकर नाट्यगृह येथे रक्तदान शिबीर आणि दुपारी तीन वाजता महिलांसाठी मेहंदी स्पर्धा घेतली जाणार आहे. इच्छुक स्पर्धक महिलांनी शिवसेना शाखा किंवा नगरसेविका सेजल परब यांच्याकडे नावनोंदणी करावी. विजेत्या प्रथम तीन क्रमांकाना अनुक्रमे २ हजार, १ हजार ५००, १ हजार रुपये व प्रमाणपत्र दिले जाणार आहे.

दुपारी तीन वाजता शिवसेना शाखा येथे महिलांसाठी पाककला स्पर्धा आयोजित करण्यात आली असून उकडीचे मोदक बनविणे हा विषय ठेवण्यात आला आहे. विजेत्या प्रथम तीन क्रमांकाना अनुक्रमे २ हजार, १ हजार ५००, १ हजार रुपये व प्रमाणपत्र दिले जाणार आहे.

गजर बाळासाहेबांचा
बाळासाहेब ठाकरे यांना मानवंदना देण्यासाठी गजर बाळासाहेबांचा या विशेष संगीत भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. भजन मंडळांना भजनात बाळासाहेब यांच्यावरील गजर सादर करणे अनिवार्य असून प्रथम येणाऱ्या दहा संघाना प्राधान्य दिले जाणार आहे. प्रथम तीन संघाना अनुक्रमे ५ हजार, ३ हजार, २ हजार तर उत्तेजनार्थ संघास १ हजार रुपयांचे पारितोषिक व प्रमाणपत्र दिले जाईल. तसेच बाळासाहेब ठाकरे यांच्यावर सादर करणाऱ्या उत्कृष्ट भजन मंडळाला १ हजार रुपयांचे विशेष पारितोषिक देऊन सन्मानित केले जाईल. नावनोंदणीसाठी दत्ता पोईपकर व अक्षय रेवंडकर यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन हरी खोबरेकर यांनी केले.