हत्येसह 35 गुन्ह्यांची नोंद, 1 लाखांचं बक्षीस असणारा कुख्यात गँगस्टर विनोद उपाध्यायचं एनकाउंटर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

एक लाख रुपयांचे बक्षीस, हत्येसह 35 गुन्ह्यांची नोंद असणारा कुख्यात गँगस्टर आणि शार्ट शूटर विनोद कुमार उपाध्याय याचे एनकाउंटर करण्यात आले आहे. उत्तर प्रदेशमधील सुल्तानपूर येथे स्पेशल टास्क फोर्सने (एसटीएफ) त्याचा खात्मा केला आहे. डेप्युटी एसपी दीपक कुमार सिंह यांच्या नेतृत्वाखाली एसटीएफच्या पथकाने ही कामगिरी केली आहे.

विनोद उपाध्याय याने स्वत:ची एक टोळी बनवली होती. या टोळीसोबत विनोदने गोरखपूर, बस्ती, संतकबीर नगर, लखनौमध्ये अनेक हत्याकांड घडवली होती. या भागात त्याच्यावर 35 गुन्ह्यांची नोंद होती. मात्र पोलिसांचे हात त्याच्यापर्यंत पोहोचत नव्हते.

गेल्या 7 महिन्यांपासून पोलीस त्याचा शोध घेत होते. शुक्रवारी सुल्तानपूर येथे एसटीएफच्या पथकाने लावलेल्या सापळ्यामध्ये विनोद अडकला. आपल्या मागे पोलीस लागल्याचे कळताच विनोदने एसटीएफच्या पथकावर गोळीबार केला. याला पोलिसांनीही जोरदार प्रत्युत्तर दिले. एसटीएफच्या कारवाईदरम्यान गोळी लागल्याने विनोद गंभीर जखमी झाला. त्याच परिस्थितीमध्ये त्याला रुग्णालयामध्येही दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

एसटीएफ आणि गोरखपूर गुन्हे शाखा गेल्या सात महिन्यांपासून विनोद उपाध्यायचा शोध घेत होते. उत्तर प्रदेशमधील माफियांच्या टॉप 10 मध्ये त्याचा समावेश होता. तो मूळचा अयोध्या जिल्ह्यातील पुरवा येथील रहिवासी होती आणि गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात यूपी पोलिसांनी त्याच्यावर 1 लाखांचे बक्षीसही जाहीर केले होते.

विनोद उपाध्याय याची गुन्हेगारी जगातील एन्ट्रीची चर्चा आहे. 2004मध्ये गोरखपूर तुरुंगात बंद असणारा आरोपी जीतनारायण मिश्र याने त्याला एका वादातून कानफटावले होते. यामुळे विनोदची सटकली आणि पुढील वर्षी जीतनारायण तुरुंगातून सुटताच विनोदने त्याची हत्या केली. त्यानंतर 2007मध्ये तो बसपाच्या तिकीटावर निवडणूकही लढला होता.