कुरिअरद्वारे गांजा, चरसची ऑनलाईन विक्री

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
फाइल फोटो

कुरिअरच्या माध्यमातून गांजा व चरसची ऑनलाईन विक्री करणार्‍या दोघांना गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथक एकने अटक केली. त्यांच्याकडून 3 किलो गांजा व 104 ग्रॅम चरस जप्त करण्यात आला आहे.

हर्षद दत्तात्रय इंगळे (21, रा. दापोडी), भागवत शेषनारायण सुरनर (20, रा. बावधन) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. शहरात ऑनलाईन पद्धतीने गांजा, चरसची विक्री होत असल्याची माहिती अंमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली होती. यानूसार वरिष्ठ निरीक्षक विनायक गायकवाड यांचे पथक हद्दीत गस्तीवर होते. या दरम्यान सिंहगड रस्ता भागात दोघेजण दुचाकीवरून गांजा व चरसची विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती पथकाला मिळाली.

यानुसार पथकाने सापळा रचून इंगळे व सुरनर यांना ताब्यात घेतले. त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडे 3 किलो 681 ग्रॅम गांजा व 104 ग्रॅम चरस आढळून आला. यानूसार त्यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली. गुन्हे शाखेचे अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त अमोल झेंडे, सहायक आयुक्त गजानन टोम्पे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक विनायक गायकवाड, सहायक निरीक्षक शैलजा जानकर, अंमलदार विशाल शिंदे, योगेश मोहीते, प्रवीण उत्तेकर, पांडुरंग पवार यांच्यासह पथकाने ही कारवाई केली.