
अर्जुन बापर्डेकर | आचरा
तीन दिवस तीन रात्री वेशीबाहेर राहणार्या चिंदर गावच्या ग्रामस्थांच्या सुरक्षेचे रवळनाथ मंदिरात शिवकळेचे आशिर्वचन झाले आणि इशार्या बरोबर ढोल वाजू लागले. भर दुपारी चिंदर ग्रामस्थ उन्हाची पर्वा न करता लवकरात लवकर गावच्या वेशीबाहेर जाण्यासाठी धावू लागले होते. कोकणातल्या एका आगळ्या वेगळ्या गावपळण परंपरेसाठी आता चिंदर गाव खाली होत होते. कोणी खाजगी वाहनांसह एसटी, रिक्षा, टेम्पोचा आधार घेतला. तर कोणी बैलगाडीतून जात होते. गुरढोरांसह कुणी धावत पळत जात होते. अवघ्या काही क्षणातच गजबजलेले चिंदर गाव शांत झाले आणि गजबजाट वाढला होता तो वेशीबाहेर रानावनात. जिथे ग्रामस्थांनी राहण्यासाठी झोपड्या उभारल्या आहेत. ग्रामस्थ आता तीन दिवस, तीन रात्री गुरा ढोरांसह, कोंबडी कुत्र्यांसह रानावनात एकमेकांच्या साथीने सहजीवनाचा आनंद घेणार आहेत. यात ख्रिचन धर्मीयही आनंदाने सहभागी झाल्याने समतेचा संदेशच या गावपळणीतून दिला जात आहे.
याबाबत अधिक माहिती घेतली आहे आमचे प्रतिनिधी कपिल गुरव यांनी
कोकणातल्या आगळ्या वेगळ्या परंपरेतील ही प्रथा. गावपळण ही प्रथा मालवण तालुक्यातील चिंदर बरोबरच आचरा वायंगणी या गावात अनुभवता येते. याची अनुभूती घेण्यासाठी चाकरमानीही मोठ्या संख्येने सहभागी होतात. दर तीन वर्षांनी होणाऱ्या या गावपळणीसाठी पळणीचे वर्ष आल्यावर त्रिपुरी पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी बारा पाच मानकरी रवळनाथ मंदिरात जमून रवळनाथाला तांदळाचा एकदाच आणि एकच कौल प्रसाद घेतला जातो. त्रिसाली मर्यादा आली असून ’या वेळी गावपळण आणि देवपळण करण्यास तुझी परवानगी आसा काय?’ असं सांगणं करून उजवा कौल प्रसाद झाल्यावर बारा पाच मानकरी एकत्र (मेळ्यावर) बसून तारीख ठरवितात.
गावपळणीच्या दिवशी दुपारीच अडीच वाजण्याच्या सुमारास बारा पाच मानकरी रवळनाथ मंदिरात जमल्यावर रवळनाथाला सांगणं करून शिवकाळ वाढवली गेली. सुरक्षेचे शिवकळेचे आर्शिरवचन घेतल्यानंतर ढोलाचा इशारा झाला आणि चिंदरवासीय वेशीबाहेर पळू लागले. ज्या भागातील लोकांना जी वेस जवळची होती त्या भागात गेल्या आठ दिवसांपासून झटून रानावनात उभ्या करण्यात आलेल्या झोपड्यात आता नव्या संसाराची सुरुवात केली जात होती. काहींनी पाहुण्यांचा आधार घेतला, तर काहींजण तीन दिवसांत पर्यटनासाठी निघाल्याचे दिसत होते. या गावात ख्रिश्चन धर्मीयही मोठ्या आनंदाने वेशीबाहेर हिंदू धर्मीयांच्या सोबत आनंदाने राहत असल्याचे दिसून येते होते.
आता तीन दिवस तीन रात्री देवाच्या भरोश्यावरच रानावनात आभाळाच्या छताखाली एकमेकांच्या सहवासात सहजीवनाचा आनंद घेतला जाणार आहे. या बाबत माहिती देताना चिंदर गावचे मानकरी विश्वास पाताडे, प्रभाकर पाताडे, नारायण पाताडे सांगतात “गावपळणीचा इशारा दिल्यानंतर संपूर्ण गाव काही क्षणातच खाली होतो. या तीन दिवसांत त्रिंबक येथील सातेरी मंदिरात दुपारी दोन वाजता बारा पाच मानकर्यांचा मेळा जमतो आणि आढावा घेतला जातो. चौथ्या दिवशी न बोलता शांत पणे बारा पाच मानकरी रवळनाथ मंदिरात एकत्र येत गाव भरण्याचा देवाचा हूकूम घेतात. तो सुद्धा एकदाच घेतला जातो. तो डावा झाल्यास पुन्हा पाचव्या दिवशी कौल प्रसाद घेतला जातो.”

























































