गेट वे परिसराला मिळणार हेरिटेज लूक! वारसा जतन समितीची मंजुरी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देशाचे प्रवेशद्वार आणि मुंबईतील सर्वांचे आवडते पर्यटन स्थळ असलेल्या ‘गेट वे ऑफ’ इंडिया परिसराचे रूपडे लवकरच पालटणार असून संपूर्ण हेरिटेज लूक मिळणार आहे. या परिसराच्या सुशोभीकरणाच्या आराखडय़ाला वारसा जतन समितीने मंजुरी दिली आहे. यानुसार परिसरातील प्लॅस्टिकचे बॅरिकेड्स, पोलीस चौकी, दिवे, तिकीट घर यांना हेरिटेज वास्तूप्रमाणे नव्याने बनवण्यात येणार आहे. यासाठी पालिका 20 कोटी रुपयांचा खर्च करणार आहे.

गेट वे ऑफ इंडियाची वास्तू तसेच त्या समोरील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा पूर्वी दुरूनही दिसायचा. मात्र 15 वर्षांपूर्वी या परिसरात बैठा प्लाझा बांधण्यात आला. शिवाय ‘26/11’ च्या हल्ल्यानंतर परिसरात सुरक्षेच्या कारणाने पोलीस चौकी, बॅरिकेड्स उभारण्यात आले. यामुळे ही वास्तू दिसण्यात अडथळे येत होते. पालिकेने या पार्श्वभूमीवर या परिसराचे सुशोभीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला असून आता प्लाझा हटवण्यात येणार आहे. शिवाय पोलीस चौकी, बॅरिकेड्स, दिवे यांना हेरिटेज लूक देण्यात येणार आहे. गेट वे ऑफ इंडिया येथून मांडवा, उरणला बोटी सुटणाऱया तिकीट खिडक्यांनाही हेरिटेज लूक देण्यात येणार आहे.

सुरक्षा मजबूत होणार

‘26/11’च्या दहशवादी हल्ल्यानंतर या परिसरातील सुरक्षा वाढविण्यात आली. संपूर्ण परिसरात बॅरिकेड्स उभारण्यात आले. हे बॅरिकेड्स हटवून हेरिटेज स्वरूपात सुरक्षा व्यवस्था करण्यात येणार आहे. शिवाय सुरक्षा व्यवस्था आणखी अत्याधुनिक करण्यात येणार आहे. n गेट वे ऑफ इंडियाच्या वास्तूच्या आत काही वर्षांपूर्वीपर्यंत जाऊन दिले जात होते. मात्र सद्यस्थितीत प्रवेश बंद करण्यात आला. आता या हिरवळीवर बसण्याचा आनंद पर्यटकांना मिळणार आहे.