
गिरगाव नाका येथील मेट्रोचे काम सुरू असणाऱ्या ठिकाणी आज भल्या पहाटे रस्ता खचल्याची घटना घडली. ही घटना भल्या पहाटे 4 वाजताच्या सुमारास घडल्याने वर्दळ नव्हती. त्यामुळेच सुदैवाने मोठी दुर्घटना टळली. मेट्रो प्रशासनाच्या बेजबाबदारपणामुळेच ही दुर्घटना घडल्याचा आरोप स्थानिकांकडून करण्यात येत आहे.
गिरगाव नाका क्रांती नगरसमोर पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. या ठिकाणी कुलाबा वांद्रे सिप्झ भुयारी मेट्रो-3 प्रकल्पाचे काम सुरू आहे. मेट्रोच्या कामामुळे गणेशोत्सवातही जलवाहिनी फुटली होती. याच भागात रस्ता खचला. यामध्ये तब्बल 25 बाय 15 ऐवढा मोठा खड्डा पडला. सुदैवाने सकाळची वेळ असल्याने मोठा अनर्थ टळला. मुंबईच्या रस्त्यांखाली अनेक केबल, जलवाहिन्या, शिवरेज लाईन गेल्या आहेत. परंतु गिरगाव येथे मेट्रोचे काम करताना मेट्रोचे अधिकारी कुठलीही दक्षता घेत नाहीत. त्यामुळे या परिसरित मेट्रोच्या कामामुळे दुर्घटना घडत असून याला मेट्रोचे संबंधित अधिकारी जबाबदार आहेत. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी रहिवासी करीत आहेत.
































































