
गोव्यात नुकत्याच पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हल ऑफ इंडिया म्हणजेच इफ्फी फेस्टिव्हलमध्ये मराठमोळी अभिनेत्री उषा जाधव हिने सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार पटकावला आहे. ‘माई घाट ः क्राईम नं. 103/2005’ या चित्रपटातील उषाच्या दमदार अभिनयासाठी हा बहुमान तिच्या वाटय़ाला आला आहे. यानिमित्त तिच्याशी साधलेला संवाद.
इफ्फीमध्ये मिळालेला बहुमान खूपच मोठा आहे. त्याबद्दल काय सांगशील.
खरंच माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. खूप मोठय़ा आंतरराष्ट्रीय स्पर्धेत झालेले हे कौतुक आहे. सुमारे 76 देशांतील 200 चित्रपट या स्पर्धेत होते. त्यातून ‘माई घाट‘ क्राईम नं. 103/2005’ या मराठी चित्रपटातील प्रभा माईन या व्यक्तिरेखेसाठी मी सर्वोत्कृष्ट अभिनेत्री ठरले. माझ्या आजवरच्या कारकीर्दीतील हा मोठा टप्पा आहे. खूप चांगले सिनेमे स्पर्धेत होते. कान्स फेस्टिवल, टोरंटो फेस्टिवलचे विजेते सिनेमा होते. त्यांच्याशी तगडी टक्कर होती. हा सन्मान माझ्यासाठी खूप खास आहे. त्यामुळे आणखी चांगले काम करण्याची जबाबदारी निश्चितच वाढली आहे.
‘माई घाट’ चित्रपट आणि तुझी भूमिका किती वेगळी आहे? काय सांगशील.
– ‘माई घाट क्राईम नं. 103/2005’ चित्रपटाची वनलाइन तुम्हाला माहिती आहेच. एका आईच्या एकुलत्या एक मुलाला पोलिसांकडून छळ करून मारले जाते. मुलाच्या मृत्यूनंतर त्याला न्याय मिळावा, यासाठी अनेक वर्षे या आईने दिलेल्या लढय़ाची ही गोष्ट आहे. अनंत महादेवन यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून मोहिनी गुप्ता निर्मात्या आहेत. माझ्यासाठी हा चित्रपट खूप कारणांनी वेगळा आहे. चित्रपटात मी माझ्या वयापेक्षा मोठी अशी व्यक्तिरेखा साकारली आहे, जे कॅरेक्टर यापूर्वी मी कधी साकारले नव्हते. माझे वय, माझी भूमिका, त्या आईची वेदना सारं खरे वाटावे, हे नक्कीच मोठे आव्हान होते. त्यासाठी परीक्षकांनीही माझे खूप कौतुक केले. माझ्या देहबोलीबद्दल त्यांनी खूप चांगले निरीक्षण नोंदवले.
तुझे आजवरचे चित्रपट बघता सामाजिक विषयाच्या चित्रपटांना तू अधिक प्राधान्य देतेस असं दिसतंय…
– सिनेमा हे समाज परिवर्तनाचे मोठे माध्यम आहे असे मला वाटते. जेव्हा आपण स्त्रीवादी- फॅमिनिझम, महिला सबलीकरण अशा गोष्टींची चर्चा करतो, तेव्हा त्या प्रक्रियेत आपलाही थोडाफार हातभार लागतोय याचा आनंद वाटतो. माझ्या भूमिकांतून या चळवळीचा मी भाग होतेय, माझ्यासाठी हेच महत्त्वाचे आहे. पुरस्कारांचा विचार करून मी चित्रपट साईन करीत नाही. याआधी ‘धग’मधील वा ‘फायरब्रँड’मध्येही माझ्या भूमिका स्ट्राँग महिलेच्या होत्या. रडत बसल्यानंतर कुणी पुरुष येऊन मदत करेल असे काम मी केलेले नाही. मुळात माझा स्वभावही तसाच स्ट्राँग आहे.
तुझ्या आगामी प्रोजेक्टविषयी काय सांगशील?
-दिग्दर्शक अनंत महादेवन यांच्यासोबत माझी आणखी एक मराठी फिल्म येईल. त्याची सगळी माहिती मी आत्ताच सांगत नाही. याशिवाय एक स्पॅनिश फिल्म करतेय ‘अलेख्रांद्रो पोर्तेस’. यामध्ये माझी प्रमुख भूमिका आहे. 19 व्या शतकातील हे नाटय़ आहे. पुढच्या वर्षी त्याच्या शूटिंगला सुरुवात होईल. याआधीही मी एक स्पॅनिश फिल्म केलेली आहे. फिल्म फेस्टिवलच्या निमित्ताने अशा ऑफर येत राहतात. काही हिंदी ऑफर्सही आहेत. त्यावरही विचार सुरू आहे.


























































