
काँग्रेसच्या आमदारांचा गट करून भाजपामध्ये प्रवेश करण्यासाठी पुढाकार घेतल्याचा ठपका ठेवत काँग्रेसने माजी मुख्यमंत्री, आमदार दिगंबर कामत आणि माजी विरोधी पक्षनेते मायकल लोबोंविरोधात गोवा विधानसभेच्या सभापतींसमोर अपात्रता याचिका दाखल केली आहे. गोवा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी ही माहिती दिली आहे.
काँग्रेसकडून मायकल लोबोंना विरोधी पक्षनेतेपदावरून हटवण्यात आले आहे. त्याच बरोबर सभागृहातील काँग्रेस आमदारांची आसनव्यवस्था बदलण्याची विनंती प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर आणि सहा आमदारांनी सभापती रमेश तवडकर यांना केली आहे. पक्षविरोधी कारवाई केल्याचा ठपका ठेवत काँग्रेसकडून दोन्ही नेत्यांची कोंडी करण्याचा प्रयत्न सध्या गोव्यात सुरु आहे, असं असलं तरी दोन्ही नेत्यांनी पक्षाच्या या निर्णयाविरोधात नाराजी व्यक्त करत आपण पक्ष बदलला नसून अजूनही आपण काँग्रेसमध्येच असल्याचे स्पष्ट केले आहे.
Michael Lobo and Digambar Kamat – we are moving a disqualification against our two senior leaders: Goa Pradesh Congress Committee president Amit Patkar pic.twitter.com/ldOo9uxoMt
— ANI (@ANI) July 11, 2022
दरम्यान, कामत आणि लोबो यांच्या बंडाच्या प्रयत्नानंतर दोघांवरही पक्षविरोधी कारवाई केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. मायकल लोबो यांची गटनेता आणि विरोधी पक्षनेतेपदावरून उचलबांगडी करण्यात आली. या दोन्ही नेत्यांवर पक्षांतर बंदी कायद्याच्या प्रक्रियेतून जी काही कारवाई असेल ती होणार असल्याची घोषणा गोवा काँग्रेसचे प्रभारी दिनेश गुंडू राव यांनी रविवारीच केली होती.
अजूनही काँग्रेससोबतच
मी काँग्रेसमध्येच मी रिटायर्ड हर्ट असलो तरी काँग्रेस सोडण्याचा प्रश्नच येत नाही पाठीमागच्या विधानसभेवेळी मी एकटा आमदार उरलो होतो. त्यामुळे पार्टी सोडण्याचा प्रश्नच येत नाही, अशी प्रतिक्रिया दिगंबर कामत यांनी दिली आहे. आपण काँग्रेसच्या तिकीटावर निवडून आलो असून अजूनही काँग्रेससोबतच असल्याचा दावा लोबो यांनी केला आहे. मात्र काँग्रेसकडून बैठकांवर बैठका घेतल्या जात असून आपल्याला पदावरुन दूर केल्याचंही मायकल लोबोंनी स्पष्ट केले आहे. तसेच सरकारमधील मंत्र्यांकडून आपल्यावर गंभीर स्वरुपाचे आरोप केले जात असून आपल्यावर कारवाईही केली जात आहे. अशा परिस्थितीत आपण विरोधी पक्षनेतेपदी राहणे कठीण असल्याचं पक्षनेतृत्त्वाला कळवल्याचेही लोबो यांनी स्पष्ट केले आहे.
भाजपाचे ‘ऑपरेशन कमळ फसफसले
गोवा विधानसभा अधिवेशनाच्या आदल्या दिवशी काँग्रेसला खिंडार पाडून ऑपरेशन कमळ यशस्वी करण्याचा भाजपाचा डाव फसला. भाजपाने काँग्रेसचे 8 आमदार फोडण्यासाठी जोरदार फिल्डिंग लावली होती, मात्र फक्त 5 आमदार त्यांच्या गळाला लागल्याने ऑपरेशन कमळ फसल्यात जमा आहे.


























































