गोवा राज्यातील एलईडी ट्रॉलर सिंधुदुर्ग किनारपट्टीवर पकडला, ट्रॉलरवर एक लाखाचे मासे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर शिरोडा समोरच्या वीस वाव खोल समुद्रात गोवा राज्यातील एक एलईडी ट्रॉलर मत्स्यव्यवसायच्या शीतल गस्तीनौकेने रविवारी मध्यरात्री पकडला.

दरम्यान, ट्रॉलर मालवण बंदरात आणून अवरूद्ध करण्यात आला आहे. ट्रॉलरवर एलईडी दिवे, जनरेटर तसेच विविध प्रकारची मासळी सापडली आहे. संबंधित ट्रॉलरमालकावर दंडात्मक कारवाई करण्यासाठी तसेच त्यांचा मासेमारीचा परवाना रद्द करण्यासाठी वेंगुर्ले तहसीलदारांकडे प्रतिवेदन दाखल केले जाणार असल्याची माहिती प्रभारी सहायक मत्स्यव्यवसाय आयुक्त रवींद्र मालवणकर यांनी दिली.

स्थानिक मच्छीमारांकडून मिळालेल्या माहितीनुसार येथील सहायक मत्स्यव्यवसाय आयुक्त हे सुरक्षारक्षक व पोलिस कर्मचार्‍यांच्या पथकासह काल मध्यरात्री वेंगुर्ले समुद्रात शीतल गस्तीनौकेद्वारे गस्त घालण्यास रवाना झाले होते. त्यांना शिरोडा समोरच्या समुद्रात वीस वाव अंतरावर एक ट्रॉलर दिसून आला. त्यांनी तेथे जात ट्रॉलरची तपासणी केली असता ट्रॉलरवर खलाशी, पागी व तांडेल असे मिळून 26 कामगार असल्याचे दिसून आले. ट्रॉलरवर जनरेटर, सात एलईडीचे दिवे, पर्ससीनचे जाळे तसेच बांगडा, म्हाकुल यासह विविध प्रकारची मासळी सापडून आली.

हा ट्रॉलर गोव्यातील असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यानुसार संबंधित मालकास ट्रॉलर अवरूद्ध करण्याची नोटीस बजावत हा ट्रॉलर मालवण बंदरात आणून अवरुद्ध करण्यात आला.

एलईडीच्या मासेमारीस केंद्र व राज्य शासनाची बंदी आहे. या ट्रॉलरवरून मासेमारी करण्यात आली तसेच आणखी मासेमारी केली जाणार होती हे दिसून आले. शासनाने मत्स्यव्यवसाय विभागास अंमलबजावणीसाठी चार अधिकार्‍यांची नियुक्ती केली आहे. त्यानुसार जिल्ह्याच्या सागरी हद्दीत अनधिकृतरीत्या मासेमारी करणार्‍यांवर कडक कारवाई सुरूच ठेवण्यात येणार आहे.

ट्रॉलरवर पाच पट दंडात्मक कारवाई व्हावी. त्याचा मासेमारीचा परवाना रद्द करण्यात यावा यासाठी वेंगुर्ले तहसीलदारांकडे प्रतिवेदन दाखल केले जाणार असल्याची माहिती मालवणकर यांनी दिली.

एक लाखाची मासळी

ट्रॉलरवर सापडलेल्या मासळीची लिलाव प्रक्रिया उशिरापर्यत सुरू होती.
ट्रॉलरवरील मासळीचा लिलाव 1 लाख 1 हजार रुपयांना झाला आहे.