कळंगुटमध्ये 42 जुगारी पर्यटकांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या; 10 लाखांसह 57 मोबाईल, जुगाराचे सामान जप्त

अनलॉक सुरू होताच देशभरातील पर्यटक जीवाचा गोवा करण्यासाठी गोव्यात येऊ लागले आहेत. त्यात जुगारी पर्यटकांचा देखील समावेश आहे. कळंगुट पोलिसांनी शनिवारी मध्यरात्री कळंगुट करिश्मा ग्रँड हॉटेलवर छापा टाकून तेथे चालू असलेला पंचतारांकीत जुगार अड्डा उधळून लावला. यावेळी महाराष्ट्र, गुजरात, दिल्ली, पंजाब, मध्यप्रदेश, तेलंगणा येथून आलेल्या 42 जुगारी पर्यटकांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून 10 लाख रुपये रोख,त सेच जुगार खेळण्यासाठी वापरलेल्या चिप्स आणि मोबाइल फोन जप्त केले.

अनलॉक नंतर देशातील पर्यटक गोव्यात येऊ लागताच अवैध धंदे जोमात सुरु झाले आहेत. आयपीएलच्या पार्श्वभूमीवर सट्टा बाजार भरण्याची शक्यता असल्याने पोलिस काही ठिकाणांवर नजर ठेवून होते. शनिवारी करिश्मा ग्रँड हॉटेलमध्ये जुगार खेळला जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर कळंगुट पोलिसांनी तेथे छापा टाकून धडक कारवाई केली. हॉटेलच्या पाचव्या मजल्यावरील दोन खोल्यामध्ये हा जुगार सुरु होता. एका खोलीत 20 तर दुसऱ्या खोलीत 22 लोक जुगार खेळत होते. जुगाऱ्यांची खाण्या-पिण्याची जंगी सोय देखील करण्यात आली होती.

उत्तर गोवा पोलिस अधीक्षक उत्कृष्ट प्रसून आणि उपधीक्षक एडविन कुलासो यांच्या मार्गदर्शनाखाली कळंगुटचे पोलिस निरीक्षक नोलास्को रापोझ यांनी छापा टाकला. त्यात 42 जुगारी पर्यटकांना ताब्यात घेऊन त्यांच्या कडून 2 एटीएम कार्ड स्वपिंग मशीन्स, 57 मोबाइल फोन आणि जुगार खेळण्यासाठी वापरलेल्या 1 हजार रुपये किंमतीच्या 5 हजार 734 चिप्स जप्त करण्यात आल्या.

आपली प्रतिक्रिया द्या