‘दै. गोदातीर समाचार’चे संपादक डॉ. रविंद्र रसाळ यांचे निधन

1269

मराठवाड्यातील ज्येष्ठ पत्रकार तथा दैनिक गोदातीर समाचारचे प्रदीर्घ काळ संपादक म्हणून राहिलेले डॉ. रवींद्र देवीदासराव रसाळ यांचे परभणी येथे आज दुपारी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते 75 वर्षांचे होते. उद्या सकाळी 10 वाजता त्यांच्यावर परभणी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे.

रवींद्र रसाळ यांच्या अचानक निधनाच्या बातमीने नांदेडमधील पत्रकारांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे पुढील महिन्यात त्यांच्या अमृतमहोत्सवानिमित्त परभणी येथे भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्याचे नियोजन सुरू होते.

रवींद्र रसाळ हे महाविद्यालयीन काळापासून अभ्यासू आणि विज्ञाननिष्ठ होते. त्यांनी एमएससी ही पदवी विशेष प्रावीण्यासह मिळवली. रवींद्र रसाळ यांचे वडील दैनिक गोदातीर समाचारचे संस्थापक संपादक होते. देवीदासराव रसाळ यांच्या निधनानंतर त्या वृत्तपत्राच्या संपादनाची जबाबदारी रवींद्र रसाळ यांच्यावर पडली. दैनिक गोदातीर समाचारमध्ये त्यांनी तर्कनिष्ठ आणि जाज्वल्य राष्ट्रभक्तीचे अग्रलेख लिहिले. त्यांनी अन्याय, अंधश्रद्धा याविरुद्ध सक्रिय आवाज उठवला. वैज्ञानिक चळवळीमध्ये रवींद्र रसाळ यांनी स्वत:ला झोकून दिले. कुशाग्र बुद्धिमत्ता आणि कल्पकता यामुळे रवींद्र रसाळ यांना भारतीय सायन्स काँग्रेसचे प्रतिष्ठेचे सदस्य पद बहाल करण्यात आले. ग्रामीण पत्रकारिता हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय होता. या विषयात त्यांनी पीएच़ डॉ. ही पदवी संपादन केली.

महाराष्ट्र शासनाच्या जाहिरातविषयक धोरणासंदर्भात अभ्यास करून जिचकार समितीला निवेदनही सादर केले होते. अधिस्वीकृती समितीचे ते काही काळ सदस्यही राहिले. कुठल्याही विषयाच्या मुळापर्यंत जाऊन ते लिखाण करत असत. विज्ञान हा त्यांच्या आवडीचा विषय होता. भूकंपावरही त्यांनी संशोधन केले होते. भूकंपाची काही प्राण्यांना पूर्वसूचना मिळते यावर त्यांनी शोधनिबंध सादर केला होता, वेध काश्मीरचा, वृत्तपत्र प्रसार, पिपलायझेशन ऑफ इंडियन रिपब्लिक ही पुस्तके वाचकप्रिय ठरली. तसेच यासह त्यांची स्वत:ची 7 ते 8 पुस्तके प्रकाशित झाली.

आपली प्रतिक्रिया द्या