
ब्रेसलेट गहाण ठेवण्याच्या नावाखाली ठगाने सोनाराची 1 लाख 80 हजारांची फसवणूक केली आहे. फसवणूकप्रकरणी एमएचबी पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
तक्रारदार हे सोने व्यावसायिक असून त्यांचे दहिसर परिसरात सोन्याचे दुकान आहे. 12 जानेवारीला तक्रारदार हे दुकानात बसले असतानाच एक जण त्यांच्या दुकानात आला. तुम्ही सोने गहाण ठेवून कर्ज देता का, अशी तक्रारदार यांना विचारणा केली. तेव्हा आपण सोने खरेदी विक्री करत असून सोने गहाण ठेवत नसल्याचे तक्रारदार यांनी सांगितले. त्यानंतर ठगाने आपले सासरे गोरेगाव येथे रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्यांच्या उपचारासाठी पैसे कमी पडत असल्याने ब्रेसलेट विकत असल्याच्या भूलथापा ठगाने मारल्या.
त्यावर विश्वास ठेवून तक्रारदार यांनी त्या ब्रेसलेटच्या खरेदीस होकार दिला. तक्रारदार यांनी ब्रेसलेटचे वजन करून त्या ब्रेसलेटची किंमत 2 लाख 20 हजार रुपये इतकी ठगाला सांगितली. सध्या मला 40 हजार रुपयांची गरज असून तेवढे द्या. सायंकाळी बिल घेऊन आल्यावर उर्वरित पैसे द्या, असे सांगून ठग निघून गेला. सायंकाळी तक्रारदार हे दुकानात बसले असताना तो ठग आला. त्याने तक्रारदार यांना ब्रेसलेटचे बिल दाखवून तो घाईघाईत निघून गेला. हा प्रकार तक्रारदार यांना संशयास्पद वाटल्याने त्यांनी ते ब्रेसलेट तपासणीसाठी पाठवले. तेव्हा ते ब्रेसलेट हे चांदीचे असल्याचे उघड झाले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी एमएचबी पोलीस ठाण्यात धाव घेतली. एमएचबी पोलिसांनी ठगाविरोधात गुन्हा नोंद करून तपास सुरू केला आहे.


























































