
अपघाताचा बनाव करून सराफाच्या कारागिराला लुटणाऱया दरोडेखोरांच्या टोळीला ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून 45 लाख रुपयांचे सोन्याची बिस्किटे जप्त करण्यात आली आहेत. अवघ्या 48 तासांत हा गुन्हा उघडकीस आला असून, सराफ कारागिरानेच साथीदारांसह हा गुन्हा केल्याचे समोर आले आहे.
दीपक प्रकाश जावळेकर (रा. दिघंची आटपाडी), अनिल चंद्रकांत भोसले (रा. प्रकाशनगर, मिरज), प्रशांत पाटील (रा. खामकरवाडी, वाशी) अशी अटक केलेल्या दरोडेखोरांची नावे आहेत.
सांगली जिह्यातील आटपाडी येथील सराफ विजय काटकर यांनी दुकानातील कामगार सुशांत बापूसाहेब वाघमारे याला जुने सोने देऊन सांगोला येथील महाकाली टेचचे दुकानात जाऊन दागिने गाळून शुद्ध करून बिस्किटे करून आणण्यासाठी पाठविले होते. सुशांत वाघमारे व त्याचा मित्र दोघे दुचाकीवरून सांगोला येथे येऊन दागिन्यांची बिस्किटे बनवून पुन्हा गावाकडे निघाले होते. रात्री साडेआठच्या सुमारास एकतपूर-आयकदाणी रोडवर पाठीमागून आलेल्या एका चारचाकी वाहनाने त्यांना धडक दिली. त्यामुळे दुचाकीसह दोघे रोडच्या कडेला पडले. त्यानंतर वाहनातील दरोडेखोरांनी त्यांना मारहाण करून सोन्याची बिस्किटे घेऊन पळ काढला होता. याप्रकरणी सांगोला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी आरोपींना अटक करून त्यांच्याजवळील चोरीतील सोन्याची बिस्किटे जप्त केली. जवळपास 45 लाख 81 हजार 522 रुपये किमतीचा हा मुद्देमाल आहे.
शेअर मार्केटमध्ये तोटा झाल्याने आखली दरोडय़ाची योजना
पोलीस तपासादरम्यान सुशांत वाघमारेच्या मित्रानेच आणखीन दोन साथीदारांसह हे सोने लुटण्याचा प्लॅन केल्याचे उघडकीस आले. या घटनेतील एकजण होमगार्ड असून, एकजण मजूर आहे. मुख्य आरोपी हा सेल्समन असून, शेअर मार्केटमध्ये तोटा झाल्याने त्याने ही दरोडय़ाची योजना आखल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे.
























































