
सामना प्रतिनिधी, मुंबई
पतपेढीत सदस्यांनी गहाण ठेवलेले सोने परस्पर दुसऱ्या बॅंकेत गहाण ठेवून त्यावर कर्ज घेतल्या प्रकरणी नॅशनल वैश्य क्रेटिड सोसायटीच्या उपाध्यक्षाला भोईवाडा पोलिसांनी अटक केली आहे. भालचंद्र खातू (62) असे त्यांचे नाव असून त्यांनी पतपेढीतील 265 तोळे सोन्याचा वैयक्तिक फायद्यासाठी गैरवापर केला आहे.
दादरच्या शिंदेवाडी परिसरात नॅशनल वैश्य क्रेडिट सोसायटीचे कार्यालय आहे. या पतपेढीतील 24 सदस्यांनी सोने गहाण ठेवून कर्ज घेतले होते. दरम्यान पतपेढीचे उपाध्याक्ष भालचंद्र खातू यांनी आपल्या पदाचा गैरवापर करत जवळपास 265 तोळे सोने ताब्यात घेऊन दुसऱया बँकेत गहाण ठेवले व त्यावर कर्ज काढले.
हा प्रकार समोर येताच पतपेढीच्या अध्यक्षांनी भोईवाडा पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी भालचंद्र खातू यांना अटक केली. खातू यांनी त्या सोन्यावर त्यांनी नेमके किती कर्ज घेतले, यासाठी त्यांना कोणी मदत केली याचा तपास सुरू असल्याचे भोईवाडा पोलिसांनी सांगितले.


























































