गुगल इंजिनिअर ठरला मूलचोरीच्या अफवेचा बळी, जमावाकडून हत्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । बीदर

धुळ्यातील राईनपाडा घटनेची पुनरावृत्ती कर्नाटकमधील बीदर येथेही झाली आहे. मूल चोरल्याच्या अफवेमुळे एका गुगल इंजिनिअरचा बळी गेला असून अन्य तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. मोहम्मद आझम अहमद (३२) असं या तरुणाचं नाव आहे.

आजतक वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार, मोहम्मद आझम आपले तीन मित्र बशीर, सलमान आणि अक्रम यांच्यासोबत हैदराबादहून बीदर येथे आले होते. त्यांना आपल्या मित्राला भेटायचं होतं. बीदर येथील मुरकी गावात राहणाऱ्या मित्राच्या घरून निघत असताना त्या दरम्यान परिसरात एक माणूस तिथे मुलांना चॉकलेट्स वाटत असल्याची आणि मूल चोरल्याची अफवा पसरली. त्यामुळे गावातील लोक मित्राच्या घरी जमा झाले आणि त्यांनी या चौघांना बेदम मारहाण करायला सुरुवात केली.

पोलिसांना घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी हजर झाले. त्यांनी बशीर, सलमान आणि अक्रम यांना जमावापासून वाचवलं. मात्र, मोहम्मद आझम हा मृत्युमुखी पडला. जखमी तरुणांना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या प्रकरणी पोलिसांनी ३० जणांना पकडलं असून मूल चोरीची अफवा पसरवणाऱ्या व्हॉट्सअॅप अॅडमिनलाही अटक करण्यात आली आहे.