मुलं चोरीची अफवेतून गुगलच्या इंजिनीअरची जमावाकडून ठेचून हत्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, बंगळुरू

मुलं चोरी करण्याच्या अफवांचे पेव आता कर्नाटकातही पोहोचले असून येथे गुगलच्या इंजिनीअरला आपला जीव गमवावा लागल्याची धक्कादायक घटना घडली आहे. कर्नाटकच्या बीदर जिल्ह्यातील या घटनेत जमावाने हैदराबादच्या सॉफ्टवेअर इंजिनीअरला बेदम मारहाण केली, यातच त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी व्हॉट्सऍप ग्रुप ऍडमिनला अटक झाली आहे.

हैदराबादच्या मलकपेट येथे राहणारा मोहम्मद आजम हा गुगलमध्ये इंजिनिअर होता. मोहम्मद हा बिदरच्या मुरकी येथे राहणार्‍या  बशीर, सलमान आणि अकरम या तीन मित्रांना भेटण्यासाठी आला होता. मित्रांची भेट घेऊन परतताना त्यांच्यातील एका मित्राने काही लहान मुलांना चॉकलेट वाटायला सुरुवात केली. त्याचवेळी व्हॉट्सऍपवर मुलं चोरी झाल्याची अफवा पसरली. त्यामुळे गावकर्‍यांनी एकत्र जमून या चारही जणांना बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. बिदरच्या एका वरिष्ठ पोलीस निरीक्षकाने स्वतः गर्दीत घुसून जमावाला पांगवले आणि या तरुणांना जमावाच्या ताब्यातून सोडवले. चौघंही गंभीर जखमी होते, जखमी अवस्थेत त्यांना रुग्णालयात नेण्यात आले पण रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच मोहम्मदचा मृत्यू झाला होता. तर नूर मोहम्मद, मोहम्मद सलमान आणि सलहम इदाल कुबेसी हे गंभीर जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.