
पोस्कोच्या गुन्ह्यात अटक करून न्यायालयात हजर करत असताना आरोपीने पोलीस वाहनातून पळ काढल्याची घटना बुधवारी घडली. अविनाश यादव असे त्याचे नाव आहे. पोलीस कोठडीतून पळ काढल्याप्रकरणी अविनाशविरोधात चारकोप पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
अविनाश हा चारकोप परिसरात राहत असून त्याचे एका अल्पवयीन मुलीसोबत प्रेमसंबंध होते. काही दिवसांपूर्वी अविनाशने त्या मुलीला पळवून नेले होते. याप्रकरणी मुलीच्या कुटुंबीयांनी केलेल्या तक्रारीवरून अविनाशविरोधात पोलिसांनी पोस्को आणि अपहरणाचा गुन्हा दाखल करून त्याला अटक करत न्यायालयात हजर केले होते. न्यायालयात हजर करण्यापूर्वी त्याची अँटिजेन चाचणी करण्यासाठी त्याला रुग्णालयात नेले जात असताना कांदिवलीदरम्यान एका सिग्नलवर पोलिसांची गाडी उभी राहिली तेव्हा अविनाशने पोलिसांच्या हाताला झटका देऊन बेडीसकट पळ काढला. पळून गेलेल्या अविनाशच्या अटकेसाठी पोलिसांनी मोहीम हाती घेतली आहे.































































