
>> शमिका कुलकर्णी, आहारतज्ञ
सध्या दिवस ताज्या भाज्यांचे आहेत. हिरव्यागार पालेभाज्या स्वस्त राहिल्या नसल्या तरी खायला मस्त… मस्त… आणि अतिशय आरोग्यपूर्ण… भविष्यात नकोशी वाटणारी औषधं घ्यायची नसतील तर आतापासूनच आहारात पालेभाज्यांचा समावेश करा.
थंडी आली की, सर्वत्र उत्साहाचे वातावरण असते. या गुलाबी थंडीत मंडईतही भरभरून भाज्यांचा समावेश असतो. यात प्रामुख्याने विविध प्रकारच्या पालेभाजा दिसून येतात. पालेभाजांमध्ये आरोग्यदायी घटकांचा मोठय़ा प्रमाणात साठा असतो.
हिवाळ्यात मंडईत पालक, मेथी, चवळी, लाल व हिरवा माठ, सरसों, शेपू, करडई, कोथिंबीर, पुदिना व अनेक इतर प्रकार मुबलक मिळतात. या भाज्यांमध्ये मोठय़ा प्रमाणात जीवनसत्त्वे, खनिजे व तंतुमय पदार्थांचा साठा असतो. सर्व पालेभाज्यांमध्ये काही विशिष्ट गुण दडलेले असतात. पालेभाज्यांचा आहारात समावेश आठवड्यातून किमान 3-4 वेळा केला पाहिजे. विविध पालेभाज्यांचे काय फायदे असतात व त्या पालेभाज्यांचा वापर आहारात कसा करावा याबद्दल जाणून घेणे महत्त्वाचे असते. हिवाळ्यात म्हणूनच सर्व पालेभाज्यांचा आहारात समावेश करून आरोग्याची विशेष काळजी घ्यावी.
असाही फायदा…
- पालेभाज्या कमी उष्मांकांच्या असल्यामुळे त्यांचा वापर वजन कमी करण्यासाठी केला जातो.
- मुबलक प्रमाणात तंतुमय पदार्थ असल्यामुळे वजन कमी करण्यासाठी, रक्तातील साखर व कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवण्यासाठी, त्याचबरोबर पचनक्रिया व बद्धकोष्ठाच्या त्रासावर गुणकारी असते.
- अ, ब, क या जीवनसत्त्वांतून डोळय़ांची काळजी, शरीरातील विविध रासायनिक क्रिया घडण्यास मदत होते व ऍण्टीऑक्साईड मिळतात.
- कॅल्शियम, मॅग्नेशियम, लोह, सोडियम, झिंक, पोटॅशियम, कॉपर, हायड्रोजनसारखी अनेक खनिजे पालेभाज्यांमधून शरीराला मिळतात व निरोगी ठेवण्यास मदत करतात.
पालक
पालकाची पालेभाजी हिवाळ्यात ताजी व कोवळी उपलब्ध असते पालकात लोह, अ, ब, क जीवनसत्त्वे व कॅल्शियमचा समावेश असतो. त्यातील तंतूमय पदार्थांमुळे पचनक्रिया सुधारते व कोलेस्ट्रॉल, साखरेची पातळी नियंत्रित राहते. वजन कमी करण्यासाठी पालकाचा समावेश आहारात केला जातो. फोलिक ऍसिड व लोह शरीरातील हिमोग्लोबीन वाढवतात. पालकाची भाजी, पालक पनीर, डाळ पालक, पालकाचे पराठे असे विविध प्रकार करता येतात.
चाकवत
ही भाजी महाराष्ट्रात सर्वत्र आवडीने खाल्ली जाते. ही पचायला हलकी असल्याने रात्रीच्या जेवणात भाकरीबरोबर याचा समावेश करावा. जंत, कावीळ, मूळव्याध, लघवीला जळजळ होणे यावर गुणकारी असते. बद्धकोष्ठावर उपयुक्त असते. आजारपणामुळे तोंडाची चव गेल्यास चाकवताची भाजी खाल्ल्याने तोंडाची चव परत येते.
मेथी
मेथीची पालेभाजी आरोग्यदायी असते. मेथीत तंतुमय पदार्थ, जीवनसत्त्वे, लोह, सोडियम, मॅग्नेशियम असल्याने आरोग्याला उपयुक्त असते. मेथी नियमित खाल्ल्याने रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यास मदत होते. त्याचबरोबर कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत होते. याचा समावेश आहारात केल्याने भूक नियंत्रणात राहाते. सारक असते, अन्नाचे पचन सुधारण्यास मदत होते. मेथीची कांदा घालून भाजी किंवा डाळ मेथी, मेथी व ताक यांची पातळ भाजी किंवा थेपले किंवा कोवळ्या मेथीची कोशिंबीर आहारात असली पाहिजे.
पुदिना
पुदिन्याचा वापर हिवाळ्यात करावा. ताजा हिरवागार पुदिना शरीरात थंडावा निर्माण करतो. ऍसिडिटी, पचनक्रिया व गॅसवर अतिशय गुणकारी असतो. थंडीतील बदलत्या हवेसाठी शरीराची प्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत होते. यात क, ड, ई जीवनसत्त्वे व कॅल्शियम, लोह व फॉस्फरससारखी खनिजे असतात. याचा आहारात चटण्या किंवा स्मुदी बनवण्यासाठी वापर केला जातो. पुदिना तोंडाची दुर्गंधी कमी करण्यास मदत करतो. याचा वापर काही पदार्थांत ग्रेवी, चटणी किंवा थंडगार पेयामध्यही करता येतो.
लाल व हिरवा माठ
माठाचे हे दोन्ही प्रकार या ऋतुत ताजे व कोवळे उपलब्ध असतात. अनेक जीवनसत्त्वे व खनिजांनी माठ परिपूर्ण असतो. म्हणून शरीराला उपयुक्त व आरोग्यदायी असतो. तंतूमय पदार्थ मुबलक असल्याने शौचाला साफ होण्यास मदत होते. आम्लपित्तावर गुणकारी लाल माठ रक्तवर्धक असतो.
शेपू
ही भाजी आरोग्याला उपयुक्त असते. वातहारक असल्याने गॅस कमी करण्यास मदत होते. पोटदुखी, जंत, कृमी यावर गुणकारी असतो. रुचकर चव असते. वेगळ्या गंधामुळे ती सर्वांनाच आवडते असे नाही. मासिक पाळी नियमित ठेवण्यात गुणकारी असते.


























































