पालकमंत्री विखेंना सोलापूरचे नियोजन जमेना, विकासकामांचा उडाला बोजवारा

महसूलमंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील हे मागील साधारण अडीच महिन्यांपासून सोलापूर दौऱ्यावर आलेले नाहीत. तसेच जिल्हा नियोजनची बैठक गेल्या सात महिन्यांत घेतली नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या विकासकामांचा बोजवारा उडाला असून, विखेंना जिल्ह्याचे नियोजन जमत नसल्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.

सोलापूर जिल्हा नियोजन समितीची बैठक 13 जानेवारी 2023 रोजी घेण्यात आली. सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री झाल्यानंतर राधाकृष्ण विखे-पाटील यांची ही दुसरी बैठक होती. त्यानंतर तब्बल सात महिने होत आले आहेत, अद्यापही जिल्हा नियोजन समितीची बैठक झालेली नाही. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत विविध विकासकामांच्या निधी खर्चाला मान्यता देण्यात येते, निधीची तरतूद करण्यात येते.

जिल्हा नियोजन समिती झाल्यानंतर कामकाजाला सुरुवात होते; परंतु पालकमंत्री विखे-पाटील यांनी नियोजन समितीच्या बैठकीला वेळ न दिल्याने दिवस वाढत जात आहेत. येणाऱ्या चार महिन्यांमध्ये लोकसभा निकडणुकीची आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. आजपर्यंत तीन वेळा जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीची तारीख काढण्यात आली आणि रद्द करण्यात आली आहे. राधाकृष्ण विखे-पाटील हे नगर जिल्ह्याचे पालकमंत्री असल्याने त्यांचे संपूर्ण लक्ष आपल्या स्वत:च्या जिल्ह्यात दिसून येते, त्यामुळे सोलापूर जिल्ह्याकडे त्यांचे दुर्लक्ष होत असल्याचे बोलले जाते.

अजित पवार हे सरकारमध्ये सामील झाल्यानंतर सोलापूर जिल्ह्याचा पालकमंत्री बदलला जाईल अशी चर्चा सुरू होती. चंद्रकांत पाटील हे सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री होतील, असेही ऐकण्यास मिळाले. त्यानंतर 15 ऑगस्टला स्वातंत्र्यदिनी ध्वजारोहणासाठी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांना मान मिळाला होता. त्यामुळे हसन मुश्रीफ हे पालकमंत्री होतील का, असाही तर्कवितर्क काढला जात आहे. परंतु, कोणताही निर्णय झाला नसल्याने राधाकृष्ण विखे-पाटील हेच आता जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. पण त्यांना कारभार जमत नसल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.