
मानसिक विकलांग मुलांसाठी दादर येथील आव्हान पालक संघ गेली 25 वर्षांपासून काम करत आहेत. संस्थेत सध्या 16 मुली आणि दोन मुले आहेत. ‘आव्हान’च्या विशेष मुलांसाठी गुढीपाडवा हा खासच असतो. कारण त्यांनी तयार केलेल्या गुढय़ा अनेक घरांमध्ये जातात. मात्र यंदा कोरोनामुळे कार्यशाळा बंद असल्यामुळे मुले गुढय़ा तयार करू शकली नाहीत. मात्र तरीही मुलांची जिद्द जराही कमी झाली नाही. आपापल्या घरी राहून अन्य बरीच कामे ती शिकली आहेत. अगदी मास्क शिवणे, भाज्या चिरणे, टेबल मॅट- ग्रिटिंग बनवणे… जणू स्वावलंबनाची गुढी त्यांनी उभारली आहे.
आव्हान पालक संघाच्या संचालिका वंदना कर्वे सांगतात, लॉकडाऊनचा काळ विशेष मुलांसाठी खरंच कसोटीचा काळ होता. मुलांची घरं लहान, त्यात त्यांना बाहेर पडता येत नव्हतं. मात्र मुलांनी जिद्दीने तोंड दिलं. गुढीपाडवा म्हटलं की मुलं हमखास गुढय़ा बनवण्याच्या उपक्रमाची आठवण काढतात. आम्ही सर्वजण एका ठिकाणी बसून हे काम करायचो. या वर्षी असं काहीच झालं नाही.
गेल्या वर्षी तयार केलेल्या गुढय़ा यावर्षी थोडय़ा विकल्या. मात्र लॉकडाऊनमध्ये मुलं-मुली इतर अनेक गोष्टी शिकल्या. आज कुणी चष्म्याचा कॉडसाठी मण्यांच्या दोऱया बनवतं, मास्क शिवतं, भाज्या चिरणे, नारळ खवणे अशी कामे घरून करतात. त्यातून अर्थार्जन होत आहे.
- आव्हान पालक संघाची विशेष मुले दरवर्षी दोन ते तीन हजार गुढय़ा तयार करतात. त्यांच्या विक्रीतून मुले थोडीफार कमाई करतात. ‘आव्हान’च्या मुलांच्या गुढय़ा अगदी परदेशातही जातात. मुलांनी बनवलेल्या नॅनो गुढीलाही खूप मागणी असते. यंदा मात्र कोरोनामुळे या गुढय़ा बनवण्याच्या कामात खंड पडला आहे.
- आव्हान पालक संघाची वसुधा कर्वे टेबल मॅट्स बनवते. वसुधा नारळ किसून देण्याचे कामही करते. केतकी आंबेकर तोरण ओवते, मास्क शिवते. प्रिया हिचकड भाजी चिरण्यात पटाईत झालेय. राजेश चाचड कागदी पिशव्या करण्यात तरबेज झालाय. भावना काळे अगरबत्ती बनवते. अभिजीत सरोदे ग्रिटिंग कार्ड बनवतो. संजीवनी सरोदे आईला घरकामात मदत करते. राहुल देशपांडे आईला चहा बनवून देतो, अशी माहिती वंदना कर्वे यांनी दिली.































































