मुख्यमंत्री रुपाणी यांचा तडकाफडकी राजीनामा! गुजरात भाजपमध्ये मोठे फेरबदल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

विधानसभा निवडणूक एक वर्षावर राहिली असताना गुजरात भाजपमध्ये मोठे फेरबदल झाले असून, मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी तडकाफडकी राजीनामा दिला आहे. कोरोना संसर्ग रोखण्यात आलेले अपयश, ढिसाळ नियोजन आणि पक्षांतर्गत नाराजी यामुळे रुपाणी यांना मुख्यमंत्रीपद सोडावे लागले अशी चर्चा आहे.

2016 मध्ये विजय रुपाणी पहिल्यांदा गुजरातचे मुख्यमंत्री झाले. 2017 ला विधानसभा निवडणुकीत भाजपला पुन्हा बहुमत मिळाल्यानंतर ते दुसऱयांदा मुख्यमंत्री बनले. पाच वर्षे ते या पदावर होते.

विजय रुपाणी यांनी राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्याकडे मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा सुपूर्द केला. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना रुपाणी म्हणाले, पक्षातील जबाबदाऱया काळानुसार बदलत राहतात. पक्षातही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. पक्ष यापुढे जी जबाबदारी देईल ती पार पाडीन. आम्ही राज्यातील निवडणुका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली लढतो. 2022ची निवडणूकही त्यांच्या  नेतृत्वाखाली लढविली जाईल.

गृहमंत्री अमित शहा यांचा दौरा आणि सत्ताबदल

गेल्या काही दिवसांपासून गुजरात सरकारमध्ये नेतृत्व बदलाची चर्चा सुरू होती. गुरुवारी रात्री आठच्या सुमारास केंद्रीय गृहमंत्री अमित शहा अचानक अहमदाबादला आले होते. त्यांच्या या दौऱयाची माहिती कोणालाही दिली नव्हती. राज्याचे गृहमंत्री प्रदीपसिंह जडेजा, महापौर किरीट परमार आणि स्थायी समिती अध्यक्ष हितेश बारोट हे केवळ विमानतळावर अमित शहांच्या स्वागतासाठी पोहोचले होते. त्यानंतर अमित शहा आपल्या बहिणीच्या घरी गेले. काwटुंबिक कामानिमित्त ते आले असावेत असे वाटत होते. मात्र, दोनच दिवसांत विजय रुपाणी यांनी राजीनामा दिल्यामुळे अमित शहा यांचा हा दौरा गुजरातमधील सत्ताबदलासाठी होता, अशी चर्चा सुरू आहे.

नितीन पटेल, चंद्रकांत पाटील यांच्यासह दोन केंद्रीय मंत्री शर्यतीत

मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत अनेक नावांची चर्चा आहे. त्यात प्रामुख्याने उपमुख्यमंत्री नितीन पटेल, प्रदेशाध्यक्ष सी. आर. पाटील अर्थात चंद्रकांत पाटील, केंद्रीयमंत्री मनसुख मांडविय आणि पुरुषोत्तम रुपाला यांची नावे आघाडीवर आहेत.

वर्षभरात भाजपने चार मुख्यमंत्री बदलले

वर्षभरात भाजपने आपले चार मुख्यमंत्री बदलले आहेत. बी. एस. येडियुरप्पा (कर्नाटक), तिरथसिंह रावत आणि त्रिवेंद्रसिंह रावत (दोघेही उत्तराखंड) आता विजय रुपाणी (गुजरात) यांचा समावेश आहे.

ढिसाळ नियोजन, पक्षांतर्गत वाद भोवला

मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्या राजीनाम्यामागे कोरोना संसर्ग रोखण्यात आलेले अपयश तसेच दुसऱया लाटेतील ढिसाळ नियोजन हे एक प्रमुख कारण असल्याचे सांगितले जाते. दुसऱया लाटेत गुजरातमध्ये कोरोनाचा कहर सुरू होता. त्यावर उच्च न्यायालयानेही राज्य सरकारवर ताशेरे ओढले होते.