
महाराष्ट्रात गुटख्याला बंदी असली तरी शेजारील खासकरून गुजरात, मध्य प्रदेश, गोवा या भाजपशासित राज्यातून मोठय़ा प्रमाणावर महाराष्ट्रात गुटख्याची तस्करी होत असल्याचे पुढे आले आहे. गुटखा तस्करांना कायद्याचा धाक राहिलेला नसल्याने राज्यात गुटख्याची तस्करी वाढत आहे. वर्षभरात महाराष्ट्रात साडेपाच कोटी रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आल्याची राज्याच्या अन्न व औषध प्रशासनाची आकडेवारी आहे.
महाराष्ट्रात 2012 मध्ये गुटखा, पानमसाला, सुगंधित सुपारी, खर्रा अश पदार्थांच्या उत्पादन, साठा, वितरण, वाहतूक व विक्रीस बंदी घालण्यात आली आहे. गुटख्याची छुप्यारीतीने विक्री करणाऱ्यांवर अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांकडून कारवाई केली जाते; परंतु अशा प्रकरणात तीन वर्षांपेक्षा अधिक शिक्षेची तरतूद नसल्याने या कायद्याचा फारसा वचक राहिलेला नसल्यामुळे गुटख्याची खुलेआम विक्री होत आहे. परिणामी गुटख्याच्या तस्करीत वाढ होत आहे.
नाशिक-पुण्यात गुटखा जोरात
अन्न व औषध प्रशासनाने गेल्या वर्षभरात राज्यात सुमारे 5 कोटी 50 लाख रूपयांचा गुटखा जप्त केला आहे. यामध्ये पुणे – 2 कोटी 28 लाख 164 रुपये; नाशिक-3 कोटी 65 लाख 22 हजार 676 रुपये; संभाजीनगर-37 लाख 13 हजार 384 रुपये; अमरावती-11 लाख 21 हजार 711 रुपये; नागपूर-7 लाख 85 हजार 734 रुपये; ठाणे-44 लाख 83 हजार 556 रुपये येथून मोठय़ा प्रमाणात गुटखा जप्त करण्यात आला आहे.
कोणत्या राज्यातून तस्करी
महाराष्ट्रात गुटख्याच्या विक्री, उत्पादन व वितरणाला बंदी असली तरी गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थान, गोवा, कर्नाटकातून चोरीच्या मार्गाने मोठय़ा प्रमाणात राज्यात गुटखा आणला जातो. यामध्ये गुजरात, मध्य प्रदेश, गोवा या प्रामुख्याने भाजपशासित राज्यांचा समावेश आहे. कर्नाटकमध्ये आता सत्तांतर झाले असले तरी पूर्वी त्या राज्यात भाजपचीच सत्ता होती असे निरीक्षण अन्न व औषध प्रशासन विभागातील अधिकाऱ्यांनी नोंदवले.
तस्करांची वाहने जप्त होणार
बेकायदेशीर लाकूडचोरी व वाहतूक करणारी वाहने सरकारजमा करण्याचे अधिकार वन विभागाला आहेत. त्याच धर्तीवर वाहने जप्त करण्याच्या संदर्भात कायद्यात सुधारणा करण्याबाबत नवी दिल्लीतील अन्न सुरक्षा व मानके प्राधिकरणास विनंती करण्यात आली आहे. त्याला लवकरच मंजुरी मिळण्याची शक्यता असून त्यामुळे गुटखा वाहतूक करणाऱ्यांना वचक बसेल असा दावा करण्यात येत आहे.

























































